पिंपरी :- मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लायन्स क्लब शताब्दी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांचे वैद्यकीय तपासणी शिबिर दिनांक 4 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन दिनांक 3 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यभरात पत्रकार वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने रविवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे या वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने मराठी पत्रकार परिषदेचे 43 अधिवेशन नुकतेच अभूतपूर्व यशस्वी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले व या संमेलन समितीचे प्रमुख बाळासाहेब ढसाळ यांच्यासह पिंपरी चिंचवड पत्रकार संघातील सर्व सदस्यांचा व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पत्रकार हल्ला वि. कृतीचे जिल्हा अध्यक्ष के. डी. गव्हाणे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सदर सन्मान सोहळा सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे.