पिंपरी (दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२):- “संस्कृत ही अनेक भाषांची जननी असल्याने बौद्धिक अन् भाषिक समृद्धीसाठी बालपणापासून संस्कृत शिकवले पाहिजे!” असे मत ज्येष्ठ संस्कृतपंडित आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे माजी प्रमुख विश्वस्त विघ्नहरी देवमहाराज यांनी मंगलमूर्ती वाडा, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चाळिशीचे औचित्य साधून नवी सांगवी येथील कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने ‘साहित्य कला संवाद’ या उपक्रमांतर्गत चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देवमहाराज यांच्या हस्ते विघ्नहरी देवमहाराज यांना कृतज्ञता सन्मान प्रदान करून त्यांच्याशी मुक्तसंवाद साधण्यात आला. कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्यवाह शिरीष पडवळ यांची व्यासपीठावर आणि विद्या विघ्नहरी देव, ज्येष्ठ संगीतकार मधू जोशी, साहित्यिक सुरेश कंक, इतिहास अभ्यासक ब.हि. चिंचवडे, ह.भ.प. अशोकमहाराज गोरे, ॲड. अंतरा देशपांडे, सुभाष चव्हाण, भाऊसाहेब गायकवाड आदींची श्रोत्यांमध्ये प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी विघ्नहरी देवमहाराज यांनी अनौपचारिक शैलीतून आपला जीवनप्रवास कथन करताना १९५४ साली त्या काळात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी जगन्नाथ शंकरशेट ही संस्कृत भाषेसाठी असलेली शिष्यवृत्ती मिळाल्याचे नमूद केले. त्यामुळे चरितार्थासाठी टपाल खात्यात नोकरी करीत बी.ए.ची पदवी मिळवली. मुद्रितशोधन, नियतकालिकांतून लेखन, संस्कृत अध्यापन करून मराठीतील काही नाट्यकृतींचे संस्कृतमध्ये अनुवाद केले. पुण्यात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. पुणे विद्यापीठात काही काळ संस्कृतचे अध्यापन केले. या वाटचालीत शंकराचार्य, पांडुरंगशास्त्री आठवले, संस्कृतपंडित अर्जुनवाडकर, साहित्यिक श्री.म. माटे, ‘काळ’कर्ते मामा दाते यांच्या सान्निध्यात ज्ञानोपासना करण्याची संधी लाभली. आर्थिक नुकसान सोसून आईच्या इच्छेखातर प्राध्यापकीचा त्याग करून चिंचवड देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदाची जबाबदारी स्वीकारली. कोठारेश्वरातील गणपतीची मंगलमूर्ती वाड्यात प्रतिष्ठापना, मोरया रुग्णालयाची उभारणी, व्याख्यानमालांचे आयोजन अशा निर्णयांना प्रारंभी विरोध झाला. तसेच भाबड्या श्रद्धेने पौराणिक आख्यायिकांचा स्वीकार न त्यांची ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे चिकित्सा केली, असे सांगून त्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज आणि मोरया गोसावी यांच्या संबंधातील अनेक गोष्टींचा ऊहापोह केला. “मोरयाने माझ्या हातून सेवा करवून घेतली!” अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

अन्वेष देशपांडे या छोट्या मुलाने सादर केलेल्या मोरयाच्या श्लोकाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविक केले. मंदार देवमहाराज यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष पडवळ यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *