– प्रतिवर्षी निर्वाह भत्ता देण्याबाबत ‘सारथी’च्या बैठकीत घोषणा
– भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगेंकडून निर्णयाचे स्वागत

पिंपरी :- सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार मराठी समाजातील विद्यार्थ्यास प्रतिवर्षी ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सारथी’च्या बैठकीत बुधवारी या निर्णयाची माहिती दिली. वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने टाकलेले हे पाऊल महत्वाचे आहे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

मराठा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सारथी संस्थेमार्फत येत्या डिसेंबरपासूनच प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थीक्षमता असलेले वसतीगृह सुरु करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एनसीईआरटी’मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व शिष्यवृत्ती न मिळालेल्या गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा ८०० रुपये याप्रमाणे वार्षिक नऊ हजार ६०० रुपये लाभ देणारी छत्रपती शाहू महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नामांकित अशा २०० विद्यापीठांमध्ये किंवा संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या व ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांच्या मर्यादेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने, उच्च शिक्षणासाठी दर्जेदार विद्यापीठांत जाण्याची इच्छा असूनही आर्थिक क्षमता नसल्यामुळे शिक्षणांच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींची दारे सरकारने खुली केली आहेत, अशा शब्दांत आमदार लांडगे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

***

मराठा समाजातील विद्यार्थी परदेशांतील नामांकित विद्यापीठांमधील उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहू नये यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणेच पदव्युत्तर पदवीसाठी दर वर्षी ३० लाखांच्या मर्यादेत आणि पीएचडीसाठी ४० लाखांच्या मर्यादेत शिष्यवृत्ती देण्याच्या निर्णयाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. शैक्षणिक उत्कर्षाच्या सर्व संधी मराठा समाजास मिळवून देण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या आश्वासनाच्या पूर्ततेचे हे आश्वासक पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *