पिंपरी : “महाराष्ट्राला दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. वास्तविक कोरोनामुळे आपण अनेक जिवलग गमावले; परंतु संकट ही इष्टापत्ती मानून ज्येष्ठांनी आपल्या साहित्यकलेच्या योगदानातून साकारलेला अंक कौतुकास्पद आहे!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक बाबू डिसोजा यांनी माउली उद्यान सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी काढले.

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या विसाव्या ‘चैतन्य दिवाळी २०२२’ या अंकाचे प्रकाशन करताना बाबू डिसोजा बोलत होते. माजी महापौर आर. एस. कुमार, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष चांदबी सय्यद, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांची व्यासपीठावर; तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भारती फरांदे, माजी नगरसेवक अमित गावडे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार यांच्यासह विविध मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती चांदबी सय्यद यांनी प्रास्ताविकातून संघाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेकविध कार्यक्रमांची माहिती दिली; आणि उपस्थितांचे स्वागत केले. चंद्रशेखर जोशी यांनी डिसोजा यांचा परिचय करून दिला. आर. एस. कुमार यांनी, “ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सातत्यपूर्ण योगदानातून पिंपरी-चिंचवड या औद्योगिकनगरीत साहित्य अन् संस्कृती रुजवली!” अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी ‘चैतन्य’ दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि जाहिरातदारांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मंजिरी कुलकर्णी यांनी ईशस्तवन सादर केले. उपस्थितांना खाऊ वाटप करण्यात आले.

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अशोक चोपडे, आनंद मुळूक, भगवान महाजन, शाम खवले यांनी संयोजनात परिश्रम घेतले. कार्याध्यक्ष अर्चना वर्टीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शुभांगी म्हेत्रे यांनी आभार मानले. सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *