पिंपरी (दिनांक : १७ ऑक्टोबर २०२२):-  “माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो; पण वाईट परिस्थिती, कुसंस्कार यामुळे तो गुन्ह्यास प्रवृत्त होतो. अशावेळी गुन्हेगारातील माणूसपण जागविणे हे अलौकिक कार्य होय!” असे गौरवोद्गार ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे रविवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यक्त केले. निवृत्त कारागृह अधीक्षक अच्युत चक्रदेव लिखित ‘मी पाहिलेले बंदीजन’ या व्यक्तिचित्रणसंग्रहाचे आणि निवृत्त पोस्ट अधीक्षक कै. लक्ष्मण पटवर्धन रचित ‘काव्यपुष्पांजली’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना किसनमहाराज चौधरी बोलत होते. विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, मोरेश्वर शेडगे, महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे-वालावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, शालिनी चक्रदेव, दिलीप पटवर्धन, हेरंब चक्रदेव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

उमा खापरे यांनी आपल्या मनोगतातून, “कैद्यांचे जग खूप वेगळे असते. त्यांना समाजात पुन: प्रस्थापित करणे ही खूप मोठी गोष्ट असून ती समाजासाठी पथदर्शक आहे!” असे विचार मांडले. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “बहिणाबाई चौधरी यांच्या कविता त्यांच्या पुत्राने बहिणाबाईंच्या मृत्यूपश्चात प्रकाशित केल्या होत्या. त्या प्रसंगाचे स्मरण आज ‘काव्यपुष्पांजली’ या कवितासंग्रहाच्या निमित्ताने झाले. प्रासादिकता, गेयता अन् माधुर्य ही वैशिष्ट्ये या कवितांमध्ये आहेत. ‘बंदीजन’ या शब्दांत संवेदनशीलता जाणवते. मर्यादित अन् बंदिस्त क्षेत्रांत काम करूनही अमर्यादित कार्य कसे करावे याचा उत्तम वस्तुपाठ अच्युत चक्रदेव यांनी समाजापुढे ठेवला आहे!” याप्रसंगी ‘आठवणीतील गाणी’ या सांगीतिक मैफलीत चैत्राली अभ्यंकर, संजीव मेहंदळे आणि प्रमोद तुपे यांनी अभिजात मराठी चित्रपटगीते, भावगीते, भक्तिगीते, लावणी आणि युगुलगीतांच्या प्रभावी सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रसन्न बाम (संवादिनी), अमृता ठाकूर-देसाई (सिंथेसाईजर), राजेंद्र हसबनीस (तबला) आणि रोहन वनगे (रिदम मशीन) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमादरम्यान ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून अच्युत चक्रदेव, कै. लक्ष्मण पटवर्धन आणि स्नेहसावली वृद्धाश्रम यांच्याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी स्नेहसावली वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची विशेष उपस्थिती होती;

तसेच स्नेहसावलीचे संचालक डॉ. अविनाश वैद्य आणि डॉ. मनाली वैद्य या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. स्मिता कोल्हटकर, संजय कोल्हटकर, मनजित कोल्हटकर, चैतन्य पाटणकर, समृद्धी पटवर्धन, रजनी जोशी तसेच यशवंत प्रकाशनाचे गिरीश जोशी यांनी संयोजनात सहकार्य केले. विनया देसाई यांनी मैफलीचे निवेदन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हेरंब चक्रदेव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *