पिंपरी (दिनांक : १४ ऑगस्ट २०२२) “आपल्या अतिप्राचीन देशाचे सांस्कृतिक संचित जपणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे!” असे विचार पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्रांतितीर्थ चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने ‘गाणारे दगड – बोलणारे पाषाण’ या अभिनव प्रदर्शनाचे १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत आयोजन केले आहे; त्याचे उद्घाटन करताना राजेश पाटील बोलत होते. बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्षा डॉ. शकुंतला बन्सल, विश्वस्त मिलिंद देशपांडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, प्रभाकर कुंटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून ॲड. सतीश गोरडे म्हणाले की, “चापेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर भगिनी निवेदिता यांनी हुतात्मा चापेकरांच्या मातोश्रीची येथे भेट घेतली असताना मला अजून मुले हवी होती म्हणजे त्यांना देशासाठी बलिदान देता आले असते, असे ओजस्वी उद्गार त्यांनी येथे काढले होते. त्या ऐतिहासिक चापेकर वाड्याचे लवकरच संपूर्ण जग दखल घेईल अशा राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे!” अशी माहिती दिली.

प्रभाकर कुंटे यांनी ‘गाणारे दगड – बोलणारे पाषाण’ या अभिनव प्रदर्शनाची माहिती देताना सांगितले की, माझे आई-वडील म्हणजे विजया आणि कै. मोरेश्वर कुंटे यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करताना दुचाकीवरून सव्वा लाख किलोमीटर प्रवास करून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून सुमारे अठरा हजार मंदिरांना भेटी दिल्या. त्यांच्या या कार्याची दखल ‘लिम्का बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली. या प्रवासात पाण्यावर तरंगणारे दगड, आघात केल्यावर संगीताचे सूर निर्माण करणारे पाषाण, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संग्रह त्यांनी केला. याशिवाय वास्तूशास्त्र, शिल्पकला यांचे अद्भुत दर्शन घडविणाऱ्या आणि अठरा हजार वर्षांचा इतिहास कथन करणाऱ्या अनेक बाबी त्यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या आहेत, अशी माहिती देऊन दिनांक १४ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चापेकर वाड्यातील या विनाशुल्क प्रदर्शनाचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. अखंड भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांनी प्रारंभी उपनिषदामधील श्लोकांचे पठण, मध्यंतरात पोवाडागायन आणि समारोप प्रसंगी कबीराच्या दोह्यांचे सादरीकरण केले.

चापेकर स्मारक समितीचे सहकार्यवाह रवींद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य गतिराम भोईर, अशोक पारखी, नीता मोहिते, विलास लांडगे, अतुल आडे संयोजनात यांनी परिश्रम घेतले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शकुंतला बन्सल यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *