पिंपरी :- “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे ही आपल्या देशवासींसाठी एक आनंददायी घटना आहे. पण आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला वास्तवाचे भान आणि कर्तव्याची जाण असणे गरजेचे आहे. लाखो क्रांतिकारकांच्या बलिदानातून आपले स्वातंत्र्य साकार झाले आहे. अमृतमहोत्सरुपी अमृत कलशातील अमृतसंचयातून आपल्याला अंधारावर मात करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. चैतन्यमयी नव्या किरणांच्या साक्षीने मरगळ झटकून आपण राष्ट्राच्या नवसंजीवनी साठी हातभार लावला तरच अमृतमहोत्सवा चे सार्थक होईल”……असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.
पिंपरी येथील मासुळकर कॉलनी मधील जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेमध्ये “भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय नेरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जेष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते प्रा. बी. आर. माडगूळकर , साहित्यिक राजेंद्र पगारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गोलांडे, प्रकाश दिघे, जनार्धन जडे, अरविंद दीक्षित, चित्रा पाठक, विष्णू शेळके…….. आदी उपस्थित होते.
राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, ” अनेक क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी घरदारावर तुळशी पत्र ठेवत प्राणांची आहुती दिली आहे. भारतावरील परचक्राची सुरुवात अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने झाली. अनेक परकीयांनी इथली संपत्ती लुटली. भारताची वैभवशाली परंपरा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. चंद्रगुप्त मौर्य , छत्रपती शिवराय असे काही अपवाद वगळता परचक्राला छेद देण्याचे काम फारसे कुणी करू शकले नाही. जनमाणसातील मरगळ आणि फंदफीतुरी यामुळे परकीयांना बळ मिळाले. ब्रिटिशांनी तर येथील संस्थाने मंडलिक बनवली आणि संपूर्ण देशावर अनिर्बंध सत्ता गाजवली. परकीय ब्रिटिशांच्या गुलामगिरी मधून मुक्ततेसाठी पुकातलेला अठराशे सत्तावन चा लढा हा संपूर्ण देशव्यापी होता. भारतीय स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग या स्वातंत्र्य संग्रामामुळे जागृत झाले. त्यानंतर राजकीय , सामाजिक पातळीवरून अनेक चळवळी उभ्या राहिल्या. देशप्रेमाने भारलेल्या आणि समाजशक्तीचे पुनरुत्थान करणाऱ्या नेतृत्वाने स्वातंत्र्याची ज्योत जागृत ठेवली. चलेजावं च्या आंदोलनानंतर प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला. ब्रिटिशांनी या भूमीतुन काढता पाय घेतला आणि देश स्वतंत्र झाला. परंतु देश फाळणीच्या यातना सोसत होता.
आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. देशामध्ये हरितक्रांती, औद्योगिक क्रांती , संगणक क्रांती, अर्थ क्रांती झाली आहे. प्रगतीपथावर देश चालला आहे. पण बेसुमार लोकसंख्यावाढ, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीधर्मातील तेढ, पर्यावरण असंतुलन, सार्वजनिक चारित्र्याचा अभाव आदी समस्या देशाच्या विकासाला मारक आहेत. आज राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याची गरज आहे. स्वातंत्र्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास पुन्हा पुन्हा नव्या पिढीसमोर जायला हवा. अमृतमहोत्सवी वाटचालीत आपण काय कमावले आणि काय गमावले याचे सिंहावलोकन झाले तरच पुढील दिशा ठरवता येईल. लोकशाही आपण शाबूत ठेवली हे उल्लेखनीय आहे. लोकशाहीतील हक्कांची जाणीव ठेवताना आपली कर्तव्ये ओळखणे हे जबाबदार नागरिकांचे लक्षण आहे. भारतमातेला वैभवाच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.” असे सांगताना राजेंद्र घावटे यांनी स्वातंत्र्य पूर्व काळ व स्वातंत्रयोत्तर काळातील अनेक घटना व प्रसंग सांगितले.
सचिव विठ्ठल लडकत यांनी सुत्रसंचालन केले. बी आर माडगूळकर यांनी आभार प्रदर्शन केले.