पिंपरी (दिनांक : १० ऑगस्ट २०२२) ०९ ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांनी राजगुरूनगर येथील भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मारकस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले. भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनी सर्व पिंपरी-चिंचवडकर साहित्यिकांच्या वतीने हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, सुरेश कंक, प्रा. राजेंद्र सोनवणे, नितीन हिरवे यांच्यासह शहरातील वेगवेगळ्या साहित्य संस्थांचे सुमारे तीस प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरूनगर शाखा प्रतिनिधी मधुकर गिलबिले हे हुतात्मा स्मारकाची उभारणी केल्यापासून आजतागायत नित्यनेमाने देखभाल करतात याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला; तसेच ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत साहित्यिकांना तिरंगा प्रदान करण्यात आला. यावेळी भरपावसात उपस्थित ‘भारतमाता’ आणि ‘वंदेमातरम’चा जयघोष करीत होते. राष्ट्रगीताने अभिवादन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर श्रावणमास आणि आदिवासी दिनाचेही औचित्य साधून साहित्यिकांनी भीमाशंकर परिसरात वर्षाविहाराचा आनंद कविसंमेलनाच्या माध्यमातून द्विगुणित केला. देशभक्ती, निसर्ग, पर्यावरण, प्रेम, पाऊस आणि सामाजिक जाणिवा अशा आशयविषयांच्या वैविध्यपूर्ण कवितांचे नंदकुमार मुरडे, शोभा जोशी, निशिकांत गुमास्ते, शामराव सरकाळे, रघुनाथ पाटील, फुलवती जगताप, प्रकाश निर्मळ, शामला पंडित, दत्तू ठोकळे, योगिता कोठेकर इत्यादींनी सादरीकरण केले. यावेळी अण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, अशोक गोरे, सुभाष चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मंचर परिसरात वृक्षारोपण केले. तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सविता इंगळे, नारायण कुंभार, प्रकाश घोरपडे, वर्षा बालगोपाल यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत जोशी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *