शहराच्या विकासासाठी महापालिकेवर राष्ट्रवादीचीच सत्ता हवी…
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार; महापालिका निवडणुकीचे रणशिंग राष्ट्रवादीने फुंकले…

पिंपरी, दि. 6 – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा सर्वांगिण विकास करण्यात यश आले. मात्र विरोधकांनी गत निवडणुकीमध्ये पक्षाची बदनामी केल्यामुळे सत्ताबदल झाला. सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम केल्याचा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज (दि. 6) झालेल्या मेळाव्यात केला.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ या मेळाव्याचे आयोजन अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते. यावेळी झालेल्या मेळाव्याला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, माजी नगरसेवक शाम लांडे, पंकज भालेकर, राहूल भोसले, विनोद नढे, जगदीश शेट्टी, मयूर कलाटे, समीर मासुळकर, विनायक रणसुंभे, प्रसाद शेट्टी, प्रशांत शितोळे, सतीश दरेकर, विक्रांत लांडे, शमीम पठाण, नारायण बहिरवाडे, डब्बू आसवाणी, प्रभाकर वाघेरे, जालिंदर शिंदे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, सुमन पवळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, यश साने, विशाल वाकडकर, फजल शेख, ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अजितदादा म्हणाले, गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत विरोधकांनी विकासकामांऐवजी पक्षाला बदनाम करण्याचे काम केले. जनतेनेही त्यांना संधी दिली मात्र गेल्या पाच वर्षातील त्यांच्या कारभाराला लोकही कंटाळले आहेत. महापालिका निवडणुका कधीही झाल्या तरी आपण तयार असले पाहिजे. पुढील काळात कोणीही गाफील न रहाता कामाला लागले पाहिजे.

गेल्या काही वर्षाऐत निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे. जनतेचे बदललेले प्रश्नांचा समावेश आपल्या जाहीरनाम्यामध्ये करून ते प्रश्न सोडविण्ण्याचा विश्वास लोकांना आपण दिला पाहिजे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक वॉर्डामध्ये सूक्ष्म पद्धतीने नियोजन झालेच पाहिजे. बुथ कमिट्या तात्काळ तयार करून प्रभागातील लोकसंख्या लक्षात घेऊन सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर राहिले पाहिजे, असेही अजितदादा म्हणाले.

भाजपवर सडकून टीका करताना अजितदादा म्हणाले, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केली जात असलेल्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. 2017 पुर्वी आम्ही बनविलेल्या रस्त्यांवर कधीही कोंडी होत नव्हती. मात्र भाजपच्या सत्ताधार्‍यांना केवळ भ्रष्टाचार करावयाचा असल्याने फुटपाथ चुकीच्या पद्धतीने बनविले जात आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
शहराला विकसीत करण्याचे काम फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्याच माध्यामातून होवू शकते हा विश्वास प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कामाला लागले पाहिजे. कष्ट आणि संघर्षाची तयारी ठेवा, विजय आपलाच आहे, यावेळी शंभर प्लसचा नारा आपल्याला यशस्वी करावयाचा असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक रणसुंभे यांनी केले तर सूत्रसंचान दिपक साकोरे यांनी केले.

हर घर राष्ट्रवादी अभियान
पिंपरी-चिंचवड शहराचा राष्ट्रवादीच्या काळात झालेला विकास हा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आतापासून हाती घेण्याच्या सूचना यावेळी अजितदादा पवार यांनी केल्या. ते म्हणाले, विरोधकांकडून ‘रंगा’चे राजकारण केले जात आहे. मात्र आपल्या पदाधिकार्‍यांनी सर्व रंगाच्या, धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वधर्मसमभावाची जपणूक केली पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर राष्ट्रवादी’ ही मोहिम हाती घेऊन विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर
राज्यपातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करण्याचे अधिकार हे स्थानिक नेत्यांनाच दिले जातील. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन करतानाच युतीबाबतही काय निर्णय घ्यायचा त्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

शिंदे, फडणवीस यांच्यावर सडकून टीका
राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत असलेले सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आले. सध्या लोकशाहीचा खून सुरू असल्याची टीका अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस यांच्यावर केली. हे दोघे मिस्टर इंडिया नाहीत, सध्या दोघेच राज्याचा कारभार हाकत असून फडणवीस हे देखील बिनखात्याचे मंत्री आहेत. स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना कोणत्याच जिल्ह्याला पालकमंत्री नसणे ही बाब दुर्देवी आहे. राज्यात जे सध्या चाललंय ते परवडणार नसून ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी जनता त्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी बोलू दाखविला. इडीच्या कारवाईवरूनही अजित पवार यांनी यावेळी निशाना साधला.

अजित गव्हाणेंकडून पदाधिकार्‍यांना संधी
आज राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात नवी प्रथा निर्माण करण्यात आली. प्रत्येक कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे त्याच धोरणातून पक्षाच्या प्रत्येक सेलच्या पदाधिकार्‍यांना या मेळाव्यात बोलण्याची संधी देण्यात आली. पक्षाच्या कामकाजाचे बारकावे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि परिणामकारक बदल यावर अनेकांनी मते मांडली. यावेळी माधव पाटील, काशिनाथ जगताप, शुक्ला पठाण, ज्ञानेश्वर कांबळे, कविताताई खराडे, पल्लवीताई पांढरे, शिवाजी पाडुळे, विजय लोखंडे, प्रसन्ना डांगे, वर्षाताई जगताप यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या संधीचे कार्यक्रमस्थळी चांगलेच कौतुक करण्यात आले.

सत्ता राष्ट्रवादीचीच, महापौर आपलाच – अजित गव्हाणे
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधार्‍यांनी गेल्या पाच वर्षांत अक्षरश: अंधाधुंद कारभार करून भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. भाजपच्या या कारभाराला जनता विटली असून शहराचा वेगवान विकास राष्ट्रवादीच्याच माध्यमातून होवू शकतो ही खात्री आता मतदारांनाही पटल्याने येत्या महापालिका निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादीचीच सत्ता येईल आणि आपलाच महापौर होईल, असा विश्वास अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, निवडणुका कधीही होऊ द्या, प्रभाग चारचा होऊ अथवा तीनचा निवडणुकीत विजय मात्र आपलाच असल्याचे ते म्हणाले. यावेळी भाऊसाहेब भोईर, कविताताई आल्हाट, रविकांत वर्पे, विनायक रणसुंभे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *