पुणे :- राज्यपाल हे संविधानिक, जबाबदार व महत्वाचे पद आहे. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून या पदाचे नेहमीच अवमूल्यन केले जात आहे. राजकीय व सामाजिक द्वेष बाळगून त्यांच्याकडून महाराष्ट्राचा व महापुरुषांचा वेळोवेळी अपमान व बदनामी केली जात आहे. हे एका विशिष्ट पक्षाचे प्रतिनिधी असल्याप्रमाणे जाहीर कार्यक्रमात बेताल वक्तव्ये करून जाणीवपुर्वक विशिष्ट समाजात तेढ व द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत.
यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना भडकावून त्यांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यांचा महाराष्ट्रात दंगे भडकविण्याचा हेतू असल्याचे नाकारता येत नाही. त्यांचे वयोमान पाहता मानसिक संतुलन ढासळले असल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळेच जबाबदार पदावर असतानाही ते बेजबाबदार विधाने करून समाजात तेढ व अशांतता निर्माण करत आहेत.
त्यामुळे भगत सिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून तात्काळ बडतर्फ करून महाराष्ट्राची व महापुरुषांची बदनामी केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशा मागणीचे निवेदन माननीय कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, पश्चिम महाराष्ट्र संघटक कॅप्टन वसंत आजमाने, कॅप्टन बाबुराव पोळके, पुणे शहर अध्यक्ष अविनाश ढोले, प्रदेश सह संघटक तातेराव मुंढे, कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत ढेंबरे, लोहगाव पुणे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, माजी सैनिक रावसाहेब हराळ, सुधीर नानासाहेब शिंदे आदी माजी सैनिक पदाधिकारी उपस्थित होते.