पिंपरी (दिनांक: २५ जुलै २०२२):- “जिद्द, कष्ट, चिकाटी यांच्या बळावर ध्येयप्राप्ती निश्चितपणे होते!” असा कानमंत्र इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २४ जुलै २०२२ रोजी दिला. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित गुणगौरव समारंभात माजी नगरसेवक सुरेश भोईर, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, कार्यवाह गोपाळ भसे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, “डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्रांव्यतिरिक्त अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी आहेत. गुणांची टक्केवारी प्रत्येक वेळी महत्त्वाची नसते. तात्पुरत्या अपयशाने खचून न जाता तसेच नोकरीच्या मागे न लागता नोकरी निर्माण करणारे उद्योजक व्हा!” असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सुरेश भोईर यांनी गुणवंतांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उषा गर्भे यांनी नागरिक संघाच्या सभासदांच्या कुटुंबीयांतील गुणवंतांचे यादी वाचन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीच्या सुमारे बावीस गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. आई, बाबा, आजी, आजोबा यांच्यासमवेत आकर्षक भेटवस्तू, प्रशस्तिपत्र, लेखणी या स्वरूपातील बक्षीस स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता; तर पालकांच्या डोळ्यांत कौतुकाचे भाव होते. यावेळी देणगीदारांनी दिलेल्या स्मृतिप्रीत्यर्थ देणग्यांमधून विशेष गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्यानंतर सत्कारार्थी गुणवंत विद्यार्थी आणि पालक यांनी कृतज्ञतापर प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली.
राजन लाखे पुढे म्हणाले की, “कार्यकर्तृत्वाच्या अवकाशात भरारी घेण्यासाठी दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे आहेत. बुद्धी सर्वांनाच असते; परंतु बुद्धीला विवेकाची जोड दिल्यास ध्येयपूर्तीचा योग्य मार्ग गवसतो. परीक्षेत उत्तीर्ण होणे हा यशाचा एक भाग आहे; पण भावी जीवनात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. त्यामुळे माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहिले पाहिजे. जगात यशस्वी माणूस होण्यासाठी व्यावहारिक ज्ञानाची नितांत आवश्यकता असते. आयुष्यात असामान्य व्हायचे असेल तर आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण विश्वास अन् आत्मविश्वासाच्या बळावर सत्कारणी लावा!” कविता, शेरोशायरी, श्लोक, सुभाषिते, कथा उद्धृत करीत लालित्यपूर्ण शैलीने राजन लाखे यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नारायण दिवेकर, सतीश कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर, भिवाजी गावडे, मंगला दळवी, रत्नप्रभा खोत, चंद्रकांत कोष्टी, सुदाम गुरव यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कार्यवाह गोपाल भसे यांनी केले. दत्तात्रय हरिभाऊ गुपचूप यांनी संयोजनात विशेष सहकार्य केले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.