पिंपरी (दिनांक : २४ जुलै २०२२) “विशेष मुलांचे संगोपन ही पालकत्वाची कसोटी असते आणि जेव्हा जन्मजात वेगवेगळ्या समस्या असलेल्या मुलांना एकाच छताखाली वाढविले जाते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने सत्वपरीक्षा ठरते!” असे विचार माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी सावरकर उद्यान, गणेश तलावाजवळ, पेठ क्रमांक २६, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक २३ जुलै २०२२ रोजी व्यक्त केले. जन्मजात मतिमंद, गतिमंद, स्वमग्न असलेल्या विशेष मुलांचे उपचार अन् पुनर्वसन करणाऱ्या स्काय चाईल्ड फाउंडेशन या संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून शर्मिला बाबर बोलत होत्या. माजी उपमहापौर शैलजा मोरे अध्यक्षस्थानी होत्या. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, स्काय चाईल्ड फाउंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा सोनाली पालांडे, उपाध्यक्षा सीमा गोरे, अंजली पालांडे आणि विशेष मुलांच्या पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यानंतर जेव्हा विशेष मुलांनी गणेशवंदना सादर केली तेव्हा सर्व उपस्थित भारावून गेले. सोनाली पालांडे यांनी प्रास्ताविकातून, “माझी स्वतःची मुलगी आदिती ही सेरेब्रल पाल्सी या दुर्धर आजाराने शंभर टक्के दिव्यांग आहे, हे लक्षात आल्यावर मन खंबीर केले. आपल्या मुलीला वाढवताना समाजातील गतिमंद, मतिमंद, स्वमग्न आणि दिव्यांग मुलांना एकाच छताखाली आधार देऊन त्यांचे उपचार अन् पुनर्वसन करावे या उद्देशाने सहा वर्षांपूर्वी स्काय चाईल्ड फाउंडेशनची स्थापना केली. यामागे कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन नसल्याने पालक आणि समाजातील अनेक व्यक्तींनी मदतीचा हात दिला. त्यामुळे विविध तज्ज्ञ, मार्गदर्शक या अभियानाशी जोडले गेले आहेत. विशेष मुले स्वावलंबी व्हावीत हा मुख्य उद्देश आहे!” अशी भूमिका मांडली. मार्गदर्शक विशाखा कदम यांनी, “विशेष मुलांनी आपली दैनंदिन शारीरिक कामे स्वतः करावीत ही किमान अपेक्षा असते; परंतु त्यासाठी पालकांनी मनावर संयम ठेवावा. त्या मुलांची मानसिकता समजून घेऊन त्यांना कोणतीही गोष्ट शिकवली तर ते नक्की आत्मसात करतात!” अशी माहिती दिली; तर स्पीच थेरपिस्ट (वाचा तज्ज्ञ) नयना सक्सेना यांनी, “ज्या मुलांना दोन वर्षांनंतरही बोलता येत नाही त्यांना शास्त्रीय पद्धतीने बोलायला शिकवावे लागते. नजरेला नजर न देणे, एकांतात रमणे अशी स्वमग्न मुलांची लक्षणे असतात. त्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकवावे लागते!” असे सांगितले. यावेळी विशाल राहेगावकर आणि नरेंद्र मंगेराव या पालकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले अनुभवकथन करताना सकारात्मक दृष्टिकोन आणि विशेष मुलांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा याबाबत पालकांनी जागरूक राहिले पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्यात. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते एकवीस मुलांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. शैलजा मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “विशेष मुलांना शरीराने, मनाने विकलांग न समजता ‘दिव्यांग’ असे संबोधले पाहिजे; कारण अंतर्मनात एक दिव्य शक्ती घेऊन ते जन्माला आले असतात. ईश्वराची पूजा समजून त्यांचे जतन अन् संगोपन केल्यास खूप मोठे मानसिक समाधान लाभेल!” असे मत मांडले. संस्थेच्या स्थापनेपासून विशेष मुलांसाठी आपला वेळ देणाऱ्या पंचाहत्तर वर्षे वयाच्या वैजयंती गोखले यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व पालांडे यांनी आभार मानले.