पिंपरी (दिनांक : १८ जुलै २०२२):- “वृक्षांमध्ये देवांचा अधिवास असतो म्हणून वृक्षारोपण हे आध्यात्मिक कर्म आहे!” असे विचार श्री क्षेत्र देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे यांनी अभंग इंग्लिश मीडियम स्कूल, देहू येथे रविवार, दिनांक १७ जुलै २०२२ रोजी व्यक्त केले. आपला परिवार (पिंपरी-चिंचवड) सोशल फाउंडेशनच्या एकशेआठ सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलजवळील गायरानावर एकशेआठ पिंपळांचे रोपण केले. अभंग स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ॲड. कैलास पानसरे, डॉ. किशोर यादव, आपला परिवारचे संस्थापक-अध्यक्ष एस. आर. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी एस. आर. शिंदे यांनी, “पिंपळवृक्ष हा मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचे उत्सर्जन करीत असल्याने भावी काळात निर्माण होणारे एकशेआठ पिंपळांचे बन म्हणजे जणू ‘ऑक्सिजन फॅक्टरी’ होईल. तसेच प्लास्टिकमुक्त शहर, पाण्याचा जपून वापर, पेड अर्थात वृक्षारोपण आणि संवर्धन या तीन ‘प’ साठी ‘आपला परिवार’ कटिबद्ध आहे!” असा सामुदायिक संकल्प मांडला अन् त्याला उपस्थितांनी अनुमोदन दिले.
डॉ. कविता अय्यर यांनी, “एक मोठे झाड एका वर्षात खूप मोठा कार्बन डायऑक्साइड शोषून वातावरणातील प्रदूषणाला आळा घालते. त्यामुळे आजचे वृक्षारोपण ही भावी पिढीसाठी आरोग्यदायी तरतूद आहे!” असे मत व्यक्त केले. प्रा. विकास कंद यांनी, “एक आई जन्म देते; परंतु ऑक्सिजन पुरविणारे वृक्ष हे मातेसमान आहेत!” अशी भावना व्यक्त केली.
बाळासाहेब राठोड, चंद्रकांत श्रीमंत यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले; तर दुर्गश्री मराठे यांनी “झाडे लावू… झाडे जगवू…” ही कविता सादर केली. ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे पुढे म्हणाले की, “देहूच्या पावन भूमीतील बोरी-बाभळींनाही सुवास आहे. संतांप्रमाणेच वृक्ष आपला देह मानवजातीसाठी किंबहुना अवघ्या चराचरासाठी झिजवत असतात. जागतिक पर्यावरणाच्या निकषानुसार प्रतिमाणसी चारशे बावीस वृक्ष असले पाहिजेत; परंतु भारतात हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण वृक्षाशी निगडित आहे; त्यामुळे प्रत्येक सणाला वृक्षारोपण केले पाहिजे!” यावेळी ‘आपला परिवार’कडून पाच हजार लीटर क्षमता असलेली पाण्याची टाकी अभंग स्कूलला प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवदांपत्याकडून एका रोपाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘आपला परिवार’च्या एकशेआठ सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत प्रत्येकी एक याप्रमाणे वृक्षारोपण करताना प्रेरणादायी घोषणा दिल्या. ‘आपला परिवार’च्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सविता होनराव यांनी प्रास्ताविक केले. अनिल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम शिर्के यांनी आभार मानले.