पिंपरी चिंचवड, दि.१० :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करताना चाकण पोलिसांनी एक कोटी एक लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल (दि.१०) जप्त केला असून एका आरोपीलाही अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांना सकाळी पाच वाजता नाशिक पुणे महामार्गावरून पुण्याला अवैधरीत्या गुटक्याचा टेम्पो जाणार असल्याची माहिती बातमीदारा मार्फत मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी अधिकारी व आमदार यांना बातमीची खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार चाकण पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वाकी खुर्द परिसरात नाशिक पुणे महामार्गावरील रोहकल फाट्याचे स्पीड ब्रेकर जवळ सापळा रचून टाटा कंपनीचा टेम्पो क एम एच २२ ए ए १७१० याच्यावर छापा टाकून सदर टेम्पोची तपासणी केली असता सदर टेम्पोमध्ये आरएमडी मसाला व एम सुगंधी तंबाखू असलेला एकूण ९१,२०,००० रुपये किंमतीचा गुटख्याचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला माल मिळून आला आहे. सदरचा गुटखा व वाहतूक करण्यासाठी वापरलेला टाटा कंपनीचा टेम्पो क एम एच २२ ए ए १७१० असा एकूण १,०१,२०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदरचा माल वाहतूक करणारा आरोपी नामे गणेश विठ्ठल भाडळे वय ३२ वर्षे, रा. कोयाळी ता. खेड जिल्हा पुणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात चाकण पोलिस स्टेशन गुरव नंबर १११५/२०२२ भादवी कलम ३२८,२७२,२७३,१८८, ३४प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनी विक्रम गायकवाड करत आहेत.