बजाजच्या कामगारांच्या हक्कांवर गदा सहन करणार नाही! वेतनकरार, ४२ दिवसांची रजा आणि महागाई भत्त्यासाठी विश्वकल्याण कामगार संघटनेचे लाक्षणिक उपोषण

– VDA आणि बोनसवरील अटींना विरोध; विद्यमान आर्थिक लाभांचे संरक्षण करण्याची मागणी

आकुर्डी, दि. २९ : बजाज ऑटो लिमिटेड, चाकण येथील कामगारांच्या प्रलंबित वेतनकराराचा प्रश्न, वार्षिक ४२ दिवसांची रजा, महागाई भत्ता (VDA), बोनस तसेच कामगारांना मिळणाऱ्या विद्यमान आर्थिक लाभांच्या संरक्षणाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. व्यवस्थापनाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या वेतनकरारातील अटींबाबत कामगारांमध्ये नाराजी असून, कामगारांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत विश्वकल्याण कामगार संघटनेच्या (VKKS) वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आकुर्डी येथील शहीद दत्ता पाडाळे पुतळा, बजाज ऑटो मेन गेटसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत कामगारांच्या मागण्या मान्य करण्याची ठाम भूमिका मांडली.

महासंघाचे अध्यक्ष दिलीप बी. पवार, उपाध्यक्ष नवनाथ डी. कडू, कार्याध्यक्ष संतोष थोरात, जनरल सेक्रेटरी राजेंद्र महाडिक, सहसचिव पांडुरंग पाटील, कमिटी मेंबर विष्णू नांगरेकर, कार्यकारिणी सदस्य अंकुश कोल्हापूरे, सल्लागार मारुती जगदाळे, अध्यक्ष किशोर सोमवंशी, जनरल सेक्रेटरी रोहित पवार, पदाधिकारी मनोज पाटील आणि कार्याध्यक्ष विकास कर्पे यांचा समावेश होता. शिवसेनेच्या नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनीही उपोषणस्थळी उपस्थित राहून कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या वेळी कामगारांच्या या प्रश्नाला पाठिंबा देण्यासाठी श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपोषणस्थळी मोठ्या संखेने उपस्थित होते.

विशेषतः वार्षिक ४२ दिवसांच्या रजेच्या मुद्द्यावर संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कंपनीतील L1 ते L4 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वार्षिक ४२ दिवसांची रजा देण्यात येत असताना L5 श्रेणीतील सुमारे दोन हजार कामगारांना केवळ २७ दिवसांची रजा मिळत असल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला. एकाच कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केवळ श्रेणीच्या आधारावर रजेबाबत एवढी मोठी तफावत असणे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान आणि न्याय्य रजा धोरण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय प्रस्तावित वेतनकरारामध्ये महागाई भत्ता (VDA) आणि बोनस गोठविण्याशी संबंधित अटींचा समावेश असल्याबाबतही संघटनेने आक्षेप घेतला आहे. महागाई सातत्याने वाढत असताना कामगारांच्या हातात प्रत्यक्ष मिळणाऱ्या वेतनावर आणि भविष्यातील आर्थिक लाभांवर मर्यादा आणणाऱ्या अटी स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका संघटनेने मांडली. कामगारांच्या मेहनतीतून कंपनीची उत्पादनक्षमता आणि आर्थिक प्रगती वाढत असताना त्याच कामगारांच्या वेतनवाढीवर व आर्थिक लाभांवर बंधने आणणे योग्य नाही, असेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

कामगारांच्या प्रश्नांवर केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष निर्णय होणे गरजेचे आहे. नवीन वेतनकरारामध्ये योग्य व न्याय्य वेतनवाढ, सर्व कामगारांना समान ४२ दिवसांची रजा, महागाई भत्त्याचे संरक्षण, बोनस व विद्यमान आर्थिक लाभ कायम ठेवणे आणि कामगारांच्या हक्कांवर मर्यादा आणणाऱ्या अटी वगळणे या मागण्यांवर व्यवस्थापनाने गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका विश्वकल्याण कामगार संघटनेने मांडली.

शिवसेना शिंदे गटाच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या की, “ मी एक शहराची नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून कामगारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून तो त्यांचा हक्क आहे. कामगारांच्या घामाच्या आणि कष्टाच्या जोरावरच हे शहर उभे राहिले आहे. कंपन्या मोठ्या झाल्यानंतर कामगारांच्या योगदानाचा विसर का पडतो? एकेकाळी ‘हमारा बजाज’ ही जाहिरात देशभर प्रसिद्ध होती; मात्र आज कामगारांच्या मनात त्याच कंपनीबाबत नाराजी निर्माण होणे ही खेदाची बाब आहे. कामगारांना न्याय मिळाला नाही, तर भविष्यात पक्ष संघटनेसह मोठे आंदोलन छेडून कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. तुमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही निश्चितच सहकार्य करू.”

दरम्यान, कंपनीची प्रगती ही केवळ उत्पादन आणि नफ्याच्या आकड्यांवर मोजता येणार नाही, तर त्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या कामगारांच्या जीवनमानातही त्याचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. कामगारांना न्याय्य वेतन, सन्मान आणि सुरक्षित भविष्य मिळाले तरच औद्योगिक शांतता आणि कंपनीची खरी प्रगती साध्य होईल, असा ठाम संदेश या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *