– भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन…

पिंपर :- तब्बल २० वर्षांच्या न्यायालयीन संघर्षास संयमीपणे साजरे जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील काँग्रेसच्या जकिया जाफरी यांची याचिका निकाली काढून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब केल्याने भारतीय जनता पार्टीची मान अभिमानाने उंचावली आहे. ही मोदी यांच्यासाठी आणि भाजपासाठी सर्वोच्च समाधानाची बाब असून ताज्या पोटनिवडणूक निकालाने देशातील सर्वसामान्य जनतादेखील मोदी आणि भाजपसोबत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे मत भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, देशाच्या न्यायव्यवस्थेवर भाजपचा पूर्ण विश्वास असल्यामुळेच वीस वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढाईत भाजपने कोठेही शक्तिप्रदर्शन, आंदोलने किंवा टीकाटिपणी करून न्यायप्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असा टोला त्यांनी विरोधी पक्षांना मारला. याउलट, या प्रक्रियेस संयमाने सामोरे जाऊन पंतप्रधान मोदी यांनी न्यायव्यवस्थेच्या सार्वभौमत्वाविषयीचा आदर देशाच्या जनतेमध्ये रुजविला. पंतप्रधानांच्या या संयमी स्वभाव वैशिष्ट्यामुळेच आज संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र असून लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने प्रस्थापित पक्षांचे बुरुज उद्ध्वस्त करून पक्षाचा झेंडा रोवला आहे. जनता मोदी यांच्यासोबत असून ‘सबका साथ सबका विकास’ या पंतप्रधानांच्या ध्येयाच्या वाटचालीत जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे सिद्ध झाले आहे.
पोटनिवडणुकांतील या विजयाआधी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानेच निकाली काढल्यामुळे भाजपचा विजय अधिक तेजस्वी झाला आहे. सन २००२ मधील गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ जणांना निर्दोष ठरविण्याच्या विशष चौकशी पथकाच्या निर्णयास काँग्रेसच्या जकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही विशेष चौकशी पथकाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पंतप्रधानांविरोधातील राजकीय कारस्थानास चपराक बसली आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *