दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अमृतेश्वर भैरवनाथ मंदिरात रंगला सोहळा…

लोणीभापकरः येथील अमृतेश्वर भैरवनाथ मंदिरात मराठेशाहीत आपल्या पराक्रमाने इतिहास गाजवणारे मातब्बर सरदार गोरखोजी भापकर यांच्या अठराव्या शतकातील ऐतिहासिक शिक्क्यांचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनावरण करण्यात आले. या शिक्क्यांचे संशोधन पुणे येथील दख्खन इतिहास संशोधन संथेचे संशोधक निखील भापकर व प्रदीप भापकर यांनी पुणे येथील पुरालेखागारातून केले आहे.

मंदिरातील घट उठवून, देवाचा छबिना आणि देवाची आरती झाल्यानंतर शिक्क्यांच्या अनावरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या वेळी गोरखोजी भापकर यांचा” श्री अमृतेश्वर चरणी तत्पर गोरखोजी भापकर निरंतर” असा गोलाकार आणि मोर्तब सूद” हा लेखनसीमेचा षटकोनी असे दोन शिक्के प्रकाशित करून, त्यांचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मु. सा. काकडे महाविद्यालयातील इतिहास अभ्यासक प्रा. दत्तात्रय जगताप यांनी कागदपत्रांवरील शिक्क्यांचे महत्त्व, प्रकार आणि त्यांच्या वापराची वैशिष्टे समजावून सांगितली. प्रा. जगताप म्हणाले की, “छत्रपतींच्या परवानगीशिवाय शिक्का व मोर्तब कोणालाच वापरता येत नव्हता. अर्थात शिक्का वापरणारा सरदार व त्याचे घराणे महत्त्वपूर्ण मानले जात असे. त्यामुळे भापकर घराण्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. या शिक्क्यातून गोरखोजी भापकरांचा श्री अमृतेश्वराप्रति असलेला समर्पित भक्तीभाव व्यक्त होतो. गोरखोजी भापकर हे छत्रपती थोरले शाहू महाराजांचे मातब्बर सरंजामी सरदार असून त्यांची पाच हजार स्वारांची फौज होती. तसेच त्यांना बीड, माहूर व पाथरी येथील सरदेशमुखीच्या सरंजामाची सनद देण्यात आली होती. अनेक लष्करी मोहिमा व लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गाजविला होता. अमृतेश्वर आणि भैरवनाथ यांचा सहसंबंध जसा काशी येथे आहे तसाच तो लोणी येथेदेखील असून मराठे कालखंडात या देवस्थानला इनाम देण्यात आले होते. तसेच या ठिकाणी गोतसभा होत असून दिव्य पार पाडली जात.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप भापकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर भापकर यांनी केले. ऐतिहासिक शिक्क्यांच्या या अनावरण सोहळ्यासाठी माजी सरपंच हनुमंतराव भापकर, दारासिंह भापकर, सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे संचालक रवींद्र भापकर, शिवसेना (उबाठा) चे तालुकाध्यक्ष हनुमंतराव भापकर, पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, दख्खन इतिहास संशोधन संथेचे विश्वस्थ अतुल रणवरे, उदयसिंह भापकर, जयदीप भापकर, शिवराम भापकर, सुनिलराजे भोसले इत्यादी मान्यवर व लोणी भापकर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनावरण सोहळ्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *