मा. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या पाठपुराव्याला यश…

पिंपरी१ जून २०२२ : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पीएमपीएमएलचे ११८ कर्मचारी मनपा आस्थापनेवर कायम करून मनपा कर्मचारी यांच्याप्रमाणे सदर कर्मचा-यांना सर्व लाभ देण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत प्रशासन विभागास आदेश पारित केले आहेत. पूर्व PCMT च्या ११८ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेवून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा सूरू केला होता. त्यास आज ख-या अर्थाने यश मिळाले आहे. अशी माहिती मा. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे.

पूर्व PCMT चे एकूण २३५ कर्मचारी सन १९९९ मध्ये तात्पुरत्या स्वरुपात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे तत्कालीन आयुक्तांचे मान्यतेने वर्ग करण्यात आले होते. PMPML मधील एकूण २३५ कर्मचाऱ्यांपैकी ११७ कर्मचारी सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. उर्वरित एकूण ११८ कर्मचारी सद्यस्थितीत महापालिकेच्या सेवेत कामकाज करीत आहेत. या सर्व कर्मचा-यांची महापालिकेत जवळपास २० वर्षे सेवा झालेली आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, तसेच इतर कर्मचा-यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी मा. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महापालिका सभागृहात ठराव पारित करून शासनाकडे पाठवून पत्रव्यवहार केला. तसेच, मनपा प्रशासन, राज्य शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

PMPML मधील ११८ कर्मचारी अद्यापही महापालिकेच्या सेवेत आहेत. त्यामध्ये चतुर्थ श्रेणीमधील शिपाई, हेल्पर, क्लिनर, वाहनचालक, लेबर इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य शासनच्या नगर विकास विभागाने PMPML च्या ११८ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सर्व लाभ देण्याचे आदेश प्रियंका कुलकर्णी- छापवाले यांनी दिले आहेत. यातील ७ कर्मचारी दिनांक ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दखल घेवून सदर PMPML कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या शासन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना/ निर्देश प्रशासन विभागास देण्यात याव्यात, याबाबत मा. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्यास आयुक्तांनी सकारात्मक भुमिका घेत ११८ कर्मचारी यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ देण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश प्रशासन विभागास पारित केले आहेत. पीएमपीएमएल कर्मचारी प्रतिनिधी शिवाजी जगताप, भास्कर फडतरे यांच्या नियमीत पाठपुराव्याला हे यश मिळाले आहे. कर्मचा-यांना ख-या अर्थाने न्याय मिळाल्याची प्रतिक्रीया व्यक्त करून भाजपाच्या सत्ता काळात नेहमीच कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचेही मा. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *