पिंपरी:- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने राळेगणसिद्धी येथे श्यामची आई कृतज्ञता सन्मान सोहळा नुकताच घेण्यात आला. टाटा मोटर्स लि. चे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील सौ. कलावती जगताप आणि डॉ.दत्तात्रय जगताप या माता आणि पुत्राला श्यामची आई सन्मान देऊन गौरविण्यात आले.नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे अध्यक्षस्थानी होते. डॉ.दत्तात्रय जगताप यांचे वडील गंगाधर जगताप, साने गुरुजी विचारांचे प्रणेते जालिंदर जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, साहित्यिक शिवाजीराव चाळक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेश कंक हे मान्यवर उपस्थित होते.

प्रा.शंकर देवरे यांनी साने गुरुजी यांचे ‘खरा तो एकचि धर्म ” या प्रार्थनागीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बाजीराव सातपुते यांनी साने गुरुजी यांच्या जीवनावर हृदयस्पर्शी विचार मांडले.

मनोहर पारळकर यावेळी म्हणाले- ‘हल्ली गाव खेडी बदलू लागली आहेत. एकी हेच बळ असते ही गोष्ट माणसे विसरली आहेत.समाज भावनाशून्य होऊ लागला आहे. यासाठी साने गुरुजी आणि श्यामची आई यांचे विचार कृतीशील करून सर्वांनीच अंगिकारले पाहिजेत. गावोगावी आई अन वडिल यांच्यावर भरभरून प्रेम करणारे श्याम अन श्यामली निर्माण झाले पाहिजेत.’ असे विचार व्यक्त केले.

खोडद ता.जुन्नर जि.पुणे येथील जालिंदर डोंगरे यांना साने गुरुजी विचार साधना पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा लातूरचे डॉ.प्रा. विठ्ठल एरंडे, खिवसरा पाटील विद्यामंदिर चिंचवडचे मुख्याध्यापक नटराज जगताप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी ता. खेड, जि. पुणे उपशिक्षिका मनिषा देवरे यांना साने गुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. कवी भरत दौडकर यांनी आई अन वडिल यांच्या भावस्पर्शी कविता सादर करून साहित्यरसिकांशी संवाद साधला.बहारदार सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. तर जयश्री साठे यांनी आभार मानले.

प्रास्ताविक करताना पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले- आण्णा हजारे जीना चढउतार करू शकत नाहीत.त्यामुळे पुरस्कार सोहळा झाल्यावर पुरस्कार्थी यांनी अण्णांना भेटून आशीर्वाद घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *