– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा स्वागतार्ह निर्णय
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिका शहर अभियंतापदी अखेर मकरंद निकम यांची नियुक्ती करण्यात आली. तसे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केले आहेत.
शहराच्या विकासाशी संबंधित ‘शहर अभियंता’ या महत्त्वाच्या पदावर महापालिकेतीलच अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याला आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, राज्य शासनाकडून आलेल्या अधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने नवीन शहर अभियंता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सह शहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे आणि राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्यात रस्सीखेच सुरू होती.
दरम्यान, महापालिकेतील सेवा ज्येष्ठतेनुसार मकरंद निकम प्रबळ दावेदार होते.
तसेच, उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट पिटशनमध्ये झालेल्या निर्णयानुसार, ज्ञानदेव जुंधारे यांची सहशहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना १ जून २०२२ पासून पदोन्नती देण्यात येणार आहे.
आयुक्तांच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत…
विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रतिनियुक्तीवर आलेले अशोक भालकर यांनी राज्यातील वरिष्ठ पातळीवर ‘फिल्डिंग’ लावली होती. भालकर हे तीन वर्षांपूर्वी शासनाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. भालकर यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या सह शहर अभियंता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपला आहे. तसेच त्यांना सह शहर अभियंता पदावरच पदोन्नती मिळावी, यासाठी शहरातील आणि राज्यातील राजकीय व्यक्तींचा आग्रह होता. मात्र, अखेर आयुक्तांनी राजकीय दबाव झुगारुन महापालिकेतील अधिकाऱ्याला संधी दिल्याने या निर्णयाचे महापालिकेतील कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे.