राळेगणसिद्धी:- महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने आज राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्त्याची यापुढील काळात कशी भूमिका असली पाहिजे यावर विचारमंथन केले. तसेच हिवरे बाजार येथे जाऊन पद्मश्री पोपटराव पवार यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी आण्णा हजारे म्हणाले-‘पद मिळते अन जातेही. याची खंत मनी न ठेवता सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतमातेची सेवा निस्वार्थ बुद्धीने केली पाहिजे.यासाठी यापुढील काळात सामाजिक कार्यकर्त्यांनी झोकून काम केले पाहिजे ‘ असे प्रतिपादन केले.
पद्यश्री पोपटराव पवार म्हणाले-‘ सामाजिक जाणिवा समृद्ध होणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाला नवीन दिशा देणारे काम अभिप्रेत आहे’ अशा भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शासनाचा कामगारभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कवी, लेखक राजेंद्र वाघ यांना अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांनी शुभाशिर्वाद दिले.
याप्रसंगी नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जगदीश कदम,प्रा.डॉ. विठ्ठल एरंडे, कवी भरत दौडकर, डॉ. दत्तात्रय जगताप उपस्थित होते.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुरेश कंक यांनी केले.