पिंपरी :- पुस्तक प्रकाशन म्हणले की, खुप गाजावाजा करून पुस्तक प्रकाशन सोहळे होत असतात, पण जगात याला अपवादात्मक लेखक कवीही असतात. याचे प्रत्यंतर म्हणजे लेखक डॉ. पी.एस.आगरवाल आहेत. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन एका वाचनालयात वाचन करीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केले. अन यावेळी “आपले हे असे आहे बुवा” या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते करायचे आहे त्या प्रसिद्ध कथालेखक बबन पोतदार यांच्या निवासस्थानी केले.
काही गोष्टी ऐतिहासिक ठरतात. एका प्रकाशकाने निर्मित केलेले पुस्तक दुसऱ्या प्रकाशकाने केले ही देखील साहित्य विश्वातील पहिली घटना ठरेल. हे पुस्तक नक्षत्राचं देणं काव्यमंच साईराजे पब्लिकेशन पुणे यांच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या संस्थेचे प्रकाशक राजेंद्र सोनवणे काही कारणास्तव येऊ शकले नाही. विश्वकर्मा प्रकाशनचे संदीप तापकीर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. शब्दधन आणि दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण , कवी निशिकांत गुमास्ते , सूर्यप्रकाश आगरवाल, सुंदर मिसळे यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी ज्येष्ठ कथालेखक बबन पोतदार म्हणाले- “अपत्यप्राप्ती नंतर जसा माणसाला आनंद होतो तसा आनंद पुस्तक प्रकाशन होताना लेखक, कवींना होतो. कथा समाजमनाचा आरसा असते. कथेला उत्तम बीजाची गरज असते. लेखक याच बीजाचे रूपांतर अंकुरात करतो.”
लेखक डॉ. पी.एस.आगरवाल म्हणाले- ” सुवर्णरोखे सांभाळतो तसे आपले लेखन लेखकांनी सांभाळले पाहिजे.माझ्या या कथासंग्रहातील सर्व कथा राष्ट्रवाद जतन करणाऱ्या आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष चव्हाण यांनी केले. आभार निशिकांत गुमास्ते यांनी मानले.