पिंपरी,ता.३०ः- शहरातील विविध प्रलंबित प्रश्नी पिंपरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी शुक्रवारी (ता.२९) अडीच तास मॅरेथॉन बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ठरवले असल्याची माहिती आ. बनसोडे यांनी या बैठकीनंतर दिली.
आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , जितेंद्र वाघ यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीला हजर होते.त्याविषयी बोलताना आ. बनसोडे म्हणाले,पिंपरी-चिंचवड महापालिकेशी सबंधित शहरातील विविध नागरी प्रश्नी पालिका प्रशासनाकडे गेले काही महिने माझा पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी आयुक्तांना निवेदनेही दिली होती. परंतू त्यावर समाधानकारक कार्यवाही न झाल्याने काल थेट महापालिकेत जाऊन बैठक घेत शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली महाराष्ट्र राज्य वीज वितरण समितीची नेमणूक प्रलंबित होती.यामध्ये १० पैकी ७ सदस्यांच्या नावाला मंजुरी देत येत्या काही दिवसात समिती नेमणूक होणार आहे.शहरवासियांची अत्यंत निकडीची गरज असलेले कर्करोग रुग्णालय पालिकेने उभारण्याची व तृतीयपंथी व्यक्तींच्या उपचारासाठी स्वतंत्र दालन उभारण्याची मागणी ही येत्या काही दिवसात पूर्ण करणार असल्याचे सांगितले त्यादृष्टीने कामकाजास सुरवात झाली आहे.तृतीयपंथी व्यक्तींना जेंडर दाखला देणे,त्यांच्या साठी स्वतंत्र स्वछतागृह उभारणे,सुरक्षा रक्षक पदी त्यांची नेमणूक करणे,एखाद्या उद्यानाची देखभालीसाठी ठेका देणे अशी कामे LGBT समुदायासाठी शहरात होणार आहेत.
मिलींदनगर येथे बुद्धविहार तसेच सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत वारंवार तिथल्या नागरिकांची मागणी होत होती तर मिलिंद नगर मध्ये 5 ते 7 गुंठे जागा तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यावर महानगरपालिका अथवा आमदार निधी मधून सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे आयोजले आहे. दलित वस्ती सुधार योजनेतून नवीन कामे करण्याचा प्रस्ताव डीपीडीसीकडे अद्याप पाठवला गेला नव्हता तो प्रस्ताव तातडीने तयार करून साडे सात कोटींच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले आहे व तो प्रस्ताव येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला जाणार आहे.
ओपन जिम साहित्य खरेदी मध्ये भ्रष्टाचार झाल्याने व ते काम नियमाने होत नसल्याने त्यावर स्थगिती आणली होती त्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लिंक रोड पिंपरी येथील पत्राशेड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गाळेवाटप रद्द करून मुळ झोपडपट्टीधारकास प्राधान्य द्यावे व त्यांना तातडीने घरे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे योजले आहे.भक्तीशक्ती ते मुकाई चौक या उड्डाणपुल व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील व निधी कमी पडत असल्यास त्याला वाढीव निधी उपलब्ध करून काम तडीस घेण्याचे योजले आहे.तसेच जेष्ठ नागरिक महासंघाच्या कार्यलयास अद्यावत जागा उपलब्ध करुन देणार आहेत.