पिंपरी (दिनांक : ३० एप्रिल २०२२):- “वेदनेला जातपात नसते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवार, दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय कामगारदिन आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, लायन्स क्लब भोजापूर गोल्ड आणि दिलासा संस्था आयोजित एकतिसाव्या श्रम-उद्योग परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर अध्यक्षस्थानी होते; तर लायन्स क्लब डी-३१३४ चे प्रांतपाल राजेश कोठावदे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते (भारतरत्न गुलझारीलाल नंदा श्रमभूषण पुरस्कार), महाराष्ट्र फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक सखाराम रेडेकर (महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार – २०२२), कृष्णा इंजिनिअरिंगचे संचालक किशोर हिंगे-पाटील (महाराष्ट्र उद्योगमित्र पुरस्कार – २०२२); तसेच किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड, एस के एफ इंडिया आणि कमिन्स इंडिया लिमिटेड यांना भारतरत्न गुलझारीलाल नंदा सुरक्षितता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
अनुक्रमे टाटा मोटर्स आणि डायनोमर्क कंट्रोल या कंपन्यांमधील कामगार मोहन गायकवाड आणि श्रीकांत (अण्णा) जोगदंड यांना कार्यक्षम गुणवंत कामगारांसाठी असलेला हुतात्मा बाबू गेनू पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी असंघटित अन् उपेक्षित कष्टकऱ्यांना सन्मानचिन्ह, मिठाई, पेहराव आणि शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये स्मशानभूमी सेवक रवींद्र डोळस, रस्त्यावरील चर्मकार आशा कांबळे, मोलकरीण संगीता पाबळे, रुग्णसेविका रेणुका वगणवार, बांधकाम मजूर लक्ष्मी गायकवाड, घरेलू कामगार छाया कुंभार, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालिका अनिता गोसावी, मनगटांपासून दोन्ही हात नसलेला दिव्यांग चहाटपरी चालक नागेश परसेनवार यांचा समावेश होता. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी संवाद साधून या कष्टकरी उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेतले; तर औद्योगिक विकास परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पुरस्कारार्थींची जडणघडण उपस्थितांसमोर उलगडली; तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कवयित्री संगीता झिंजुरके यांच्या गीतगायनाने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. कवी राजेंद्र वाघ लिखित ‘श्रमिकांचं गोंदण’ या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मनोहर पारळकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “माणूस माणसाला माणसासारखा वागवत नाही. तसेच श्रमिकांच्या श्रमाची किंमत केली जात नाही. या पार्श्वभूमीवर श्रम-उद्योग परिषदेत मात्र कष्टकऱ्यांची उचित दखल घेतली गेली, ही स्तुत्य बाब आहे!” असे गौरवोद्गार काढले. प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “पैशांच्या खेळाने अन् पातळीहीन राजकारणाने समाजातील माणुसकी संपुष्टात आणली असली तरी एकाच व्यासपीठावर श्रमिक आणि उद्योजक यांचा सन्मान झाला, हे माणुसकीचे लक्षण आहे. सर्व महापुरुषांनी श्रमाचे महत्त्व अधोरेखित केले असल्याने या सोहळ्यातून विषमतेचे बळी ठरलेल्यांना सन्मानित केल्याने त्या महापुरुषांना वंदन केल्यासारखे आहे. त्यामुळे या दुर्लक्षित, उपेक्षितांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे!” जयवंत भोसले, अरुण गराडे, सुभाष चव्हाण, वर्षा बालगोपाल यांनी संयोजनात सहकार्य केले.
बाजीराव सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. सुदाम भोरे यांनी आभार मानले.