पुणे (प्रतिनिधी ) : पुण्यात येरवडा येथे तीनही शहीद वीरांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहण्यासाठी “शहीद दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सैनिक कल्याण समितीचे सचिव, माजी सैनिक अधिकारी, राजमाता येसुबाई साहेब (ऐतिहासिक राजेशिर्के घराणे) यांचे वंशज , शंभुसेना प्रमुख मा. दिपकजी राजेशिर्के यांच्या हस्ते शहीद भगतसिंगांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिन्ही शहिदांना अभिवादन करण्यात आले.
आज शहीद दिवसा निमित्त आजच्या दिवशी म्हणजेच २३ मार्च १९३१ रोजी शहीद भगत सिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर या तिन्ही शूरवीर देशभक्तांना जुलमी इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी तिघांनीही तीव्र क्रांतिकारी लढा दिला होता. हा लढा शेवटच्या क्षणाला “शहीद दिवस” म्हणून ओळखला गेला खरंतर हा दिवस भारतीय इतिहासातील एक काळा दिवस आहे परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे तिन्ही महानायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्श स्थानी देखील आहेत.
याप्रसंगी वेटरण इंडिया, महाराष्ट्राचे प्रमुख माजी सैनिक भोला सिंग, माजी सैनिक कॅप्टन परशुराम शिंदे, सैनिक फेडरेशन पुणे जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक बाबासाहेब जाधव, माजी सैनिक राजेंद्र निकाडे, माजी सैनिक जसवंत शिंह, माजी सैनिक अधिकारी योगेंद्र कौशिक, एअरफोर्सचे माजी सैनिक मदन ठाकूर, विशाल चौहान सर, सचिन सर, तसेच साई करिअर अकॅडमी संचालित भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र लोहगांवचे विद्यार्थी उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हसत-हसत मृत्यूला सामोरे जाणारे, भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी.. शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं जीवन देशासाठी अर्पण केलं..यांच्या हौतात्म्याला उपस्थित सर्वच माजी सैनिकांसह शंभुसैनिकांनी त्रिवार सॅल्युट करत… जय हिंद, जय भारत.. वंदे मातरम् व भारत माता की जय चा जोरदार नारा दिला.