पिंपरी (दिनांक:२२ मार्च २०२२):- कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलन शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी सकाळी ठीक साडेआठ (०८:३०) वाजता श्रमशक्ती भवन, बजाज ऑटोसमोर, आकुर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन नामदार अजितदादा पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील स्वागताध्यक्ष असून केंद्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदनकुमार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष सुदाम भोरे, ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, माजी संमेलनाध्यक्ष तुकाराम धांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘आयुष्याची वाट तुडवताना…’ या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ चित्रपटनिर्माते, विडंबनकार रामदास फुटाणे यांची मुलाखत कवी भरत दौंडकर घेतील. कविवर्य उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या सत्रात ‘घामाचे गाव’ हे निमंत्रित कष्टकरी कवींचा सहभाग असलेले कविसंमेलन होईल. संमेलनात सुमारे अकराशे वेळा डायलिसीसला सामोरे जाणारे कविवर्य माधव पवार आणि कामगारभूषण पुरस्कार जाहीर झालेले राजेंद्र वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. भोजनोत्तर ‘कष्टकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट केव्हा उगवेल?’ या चर्चासत्रात पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते सहभागी होतील. समारोप सत्रात डॉ. सुरेश बेरी (सामाजिक कार्यकर्ते), अलका पडवळ (घरेलू कामगार), तुकाराम माने (हातगाडी धारक), सद्दाम आलम (बांधकाम मजूर) यांच्या मुलाखती आणि सत्कार होतील. पद्यश्री कवी नारायण सुर्वे यांच्या नावाने कष्टकरी कामगारांचे हे पहिले साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. विनाशुल्क असलेल्या या साहित्य संमेलनाचा लाभ सर्व साहित्यिक, साहित्यरसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक काशिनाथ नखाते, मुख्य निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले आणि मुख्य समन्वयक सुरेश कंक यांनी केले आहे.