आयुक्त राजेश पाटील यांचे अतिक्रमण निरीक्षकांना धडक कारवाईचे आदेश…
पिंपरी, १७ मार्च २०२२ : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदपथ व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे / अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर व अतिक्रमणावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम अन्वये २४३-अ (१). २०८ व ३९२(१) अतिक्रमण पथक व धडक पथकाने दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी अतिक्रमण विभाग व अतिक्रमण निरीक्षकांना दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील पदपथ व सायकल ट्रक नागरिकांना वापर करण्यासाठी उपलब्ध करून देण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. तथापि, शहरातील बहुतांश पदपथ व सायकल ट्रॅकवर नागरिक अनाधिकृतपणे/अतिक्रमण करून वाहने पार्क करतात. अशा प्रकारांमुळे नागरिकांना पदपथावर चालतांना व सायकल ट्रॅकवर सायकल चालवतांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पदपचावर व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे/अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणे व अतिक्रमण निष्काशीत करणे आवश्यक आहे. सार्वजनिक रस्त्यांच्या किंवा विशिष्ट सार्वजनिक रस्त्यांच्या बाजूस किंवा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे पादचा-यांना धोका निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २०८ नुसार ती वाहने ओढून नेण्याची किंवा त्यांचे स्थलांतर आणि कलम २४३ अ (१) नुसार अशी वाहने महापालिका आयुक्तांना योग्य वाटेल, अशा जागी उभी करून ठेवण्यात येतील. त्यासंबंधातील फी किंवा शुल्क आकारण्यास आयुक्तांना अधिकार प्राप्त आहेत. तसेच महापालिका अधिनियम कलम ३९२(१) अन्वये वरील कलम २४३ अ (१) व कलम २०८ मधील तरतुदींचे उल्लंघन किंवा अनुपालन करण्यात कसूर केल्याप्रकरणी अशा प्रत्येक अपराधाबद्दल दंडाची शिक्षा करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यावरील अतिक्रमण करणे, वाहने लावणे व तत्सम गोष्टी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.
त्याअनुषंगाने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेच्या सर्व रस्त्यावरील पदपथ/पादचारी मार्गावर होणाऱ्या सर्व प्रकारचे अतिक्रमण वाहनांवर कारवाई करून जमा करणे आणि त्यावर दंडात्मक रक्कम वसुली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षकांनी क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील धडक पथकामार्फत कारवाई करुन आपल्या अधिनस्त क्षेत्रातील सर्व पदपथ / पादचारी मार्ग लोकांना चालण्यास सुरक्षित व सुस्थितीत रिकामे राहतील, याची दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पदपथावर वाहने पार्क केली असतील किंवा अतिक्रमण असेल त्यावर दंडात्मक कारवाई करावी, त्याबाबतचा अहवाल सह शहर अभियंता ( अतिक्रमण ) यांचेमार्फत आयुक्त कार्यालयाकडे देण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे.