– माजी महापौर नितीन काळजे यांच्या पुढाकाराने विविध प्रकल्प मार्गी…
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माजी महापौर व नगरसेवक नितीन काळजे यांच्या पुढाकाराने विविध विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामुळे चऱ्होली हे विकासाचे रोल मॉडेल होत आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
माजी महापौर नितीन काळजे यांनी आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात मंजूर केलेले आणि गेल्या ५ वर्षांत पाठपुरावा केलेले विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, साधना तापकीर, नगरसेवक अजित बुर्डे, भाजपा कोषाध्यक्ष शैलजा मोळक, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष भाऊ रासकर, सुरेश तापकीर, बाबासाहेब तापकीर, सुनील काटे, रामदास काळजे, संतोष तापकीर, पोपटराव काटे, पांडुरंग पठारे, पंढरीनाथ पठारे, शहाजी तापकीर, कुंडलिक पठारे, कुर्मदास तापकीर, आप्पासाहेब भोसले, श्रीकांत तापकीर, शेखर फुगे, सुरेश निकम, बापू भोसले, प्रवीण काळजे, दत्ता तापकीर, अतुल काळजे, सचिन दाभाडे, भाऊसाहेब रासकर, रवींद्र येळवंडे, दिलीप कोतवाल यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व मित्र परीवार उपस्थीत होते.
यावेळी प्रभाग क्र. ३ वडमुखवाडी येथील जलतरण तलाव आणि च-होली येथील वाघेश्वर महाराज उद्यान व क्रिडा संकुल, बुर्डेवस्ती पाण्याची टाकी लोकार्पण करण्यात आले. वडमुखवाडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव, बुर्डेवस्ती येथे २० दशलक्ष लीटर क्षमतेचा जलकुंभ, प्राईड सिटी टाकीचे भूमिपूजन करण्यात आले.
वाघेश्वर महाराज उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅक, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, स्त्री- पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृह आदींचा समावेश आहे. वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेला जलतरण तलाव २५ मी. लांब, १६ मी. रुंद व २.१ मी. खोली असून संपूर्ण तलाव अंडरकव्हर आहे. चऱ्होली व आजूबाजूच्या भागातील नागरिकांना याचा वापर करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत. नागरिकांच्या सर्वसामान्य सोयीसुविधा यांना प्रथम प्राधान्य देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
मंजूर केलेली कामे पूर्ण झाल्याचे समाधान : नितीन काळजे
माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे म्हणाले की, गेल्या २० वर्षांमध्ये समाविष्ट गावांमध्ये विकास झाला नाही. मात्र, २०१७ मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यामुळे चऱ्होलीसह समाविष्ट गावांतील विकासाला चालना मिळाली. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवकांनी एकजुटीने विकासकामे हाती घेतली. महापौर पदाच्या कार्यकाळात मंजूर केलेली आणि तरतूद केलेली कामे माझ्याच कार्यकाळात पूर्ण होत आहेत, याचे समाधान वाटते.