प्राधिकरण येथे रेसिपी मन तृप्त करणारी कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
नगरसेवक अमित गावडे, शर्मिला महाजन यांचे आयोजन…
पिंपरी :- नगरसेवक म्हणून नाही तर माणूस सेवक म्हणून अमित गावडे यांनी केलेलं काम खूप चांगलं आहे, असे गौरवोद्गार मधुराज किचनच्या सर्वेसर्वा मधुरा बाचल यांनी काढले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मधुरा बाचल बोलत होत्या.
अनुष्का स्त्री कलामंच आणि श्री समर्थ प्रतिष्ठान तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘रेसिपी मन तृप्त करणारी’ हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनुष्का स्त्री कलामंचच्या अध्यक्षा शर्मिला महाजन, नगरसेवक अमित गावडे, राहुल गावडे, निगडी प्राधिकरण परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मधुरा बाचल म्हणाल्या, “नगरसेवक म्हणून नाही तर माणूस सेवक म्हणून अमित गावडे यांनी काम केले. परिसरातील महिला आणि नागरिकांसाठी त्यांनी वेळोवेळी खूप चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं आहे. त्यांनी विविध क्षेत्रात खूप चांगलं काम केलं आहे. काही करायचं असेल तर पहिलं पाऊल उचला बाकीचा प्रवास झालाच म्हणून समजा, असा सल्ला देखील मधुरा यांनी महिलांना दिला.
नगरसेवक अमित गावडे म्हणाले, “मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या भयंकर साथीतून आपण सावरत आहोत. या साथीत आपल्या जवळपासचे अनेकजण आपल्याला सोडून गेले, त्यांना अभिवादन करतो. कोरोना काळात अनेकांना जेवण देण्यासाठी जे हात राबले त्यांचा सन्मान व्हायला हवा म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने अन्नपूर्णा सन्मान प्रातिनिधिक सन्मान होत आहे.”
शर्मिला महाजन म्हणाल्या, “कोरोना महामारी नंतर पुन्हा एकत्र आलो याचा आनंद आहे. ज्या क्षेत्रात महिलांची मक्तेदारी आहे असं म्हटलं जातं त्या क्षेत्रात विष्णू मनोहर यांनी स्वतःची ओळख बनवली आहे. मधुरा बाचल या देखील उत्तम प्रकारे सादरीकरण करून चांगले चांगले पदार्थ शिकवतात, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमस्थळी खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. याचे उदघाटन शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्राधिकरण परिसरातील अन्नपूर्णांचा सन्मान करण्यात आला. मधुरा बाचल आणि विष्णू मनोहर यांनी महिलांना किचनमधील टिप्स दिल्या. तसेच विष्णू मनोहर यांनी काही रेसिपीज देखील महिलांना बनवून दाखवल्या.
स्नेहा भिंगारकर यांनी शंखनाद केला. शंखनाद आणि गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीपा चिरपुटकर, वृंदा देसाई, उषा गर्भे, गीता कदम, समृद्धी पैठणकर, अनुजा दोषी, आरुषा शिंदे, शामल जम्मा, सुरेखा भालेराव, स्वाती धर्माधिकारी आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.