राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त सुरक्षितता कविसंमेलन, सुरक्षा सन्मान आणि प्रबोधन उपक्रम…

पिंपरी, दि.४- कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी संघर्ष महासंघ कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त कविसंमेलन, सुरक्षा प्रबोधन, वर्षभर विनाअपघात काम केलेल्या कामगारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते होते. प्रमुख अतिथी कामगारभूषण पुरुषोत्तम सदाफुले आणि पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार प्राप्त बाजीराव सातपुते होते.
याप्रसंगी कवी राजेंद्र वाघ, आण्णा गुरव, रामचंद्र प्रधान,माधुरी जलमूलवार, चंद्रकांत कुंभार, राजेश माने, सुरज देशमाने ,सुनिता दीलपाक, सविता करपे, अर्चना पाटील, हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते म्हणाले- ‘तळेगाव,रांजणगाव, चाकण एम आय डी सी परिसरात अनेक छोटे, मोठे कारखाने आहेत. कारखान्यातील मनुष्यबळ कमी पडले तर मजूर अड्ड्यावरील अशिक्षित कामगारांना एक दिवस कामाचे वेतन देऊन कारखान्यात काम दिले जाते. सुरक्षेविषयी अज्ञान असलेल्या या कामगारांना प्राथमिक सुरक्षा माहिती सांगणे हे कारखान्यातील अधिकारी वर्गाचे कर्तव्य आहे.सावधानपूर्वक काम करून जीवाला जपलेच पाहिजे.’

कष्टकरी कामगारांच्या हस्ते कुंडीतील वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कवी कुमार कुलकर्णी यांनी “श्रमिक हो! जतन करू देहाला” हे सुंदर स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केले.

यावेळी पुरुषोत्तम सदाफुले यांनी श्रमिक कामगारांशी मनमोकळा संवाद साधला. “भाजणे, घसरणे, उंचावरून पडणे, यंत्राची माहिती नसताना काम करणे यामुळे होणारे अपघात टाळता येऊ शकतात. आपले भविष्य आपल्याच हाती असते. असे प्रतिपादन केले.”
बाजीराव सातपुते म्हणाले- ‘बेसावध काम करू नये. सतर्क बनून काम करणे हाच अपघातापासून वाचण्याचा रामबाण उपाय आहे.’

वर्षभर विनाअपघात काम करणारे कामगार लहू शिंदे, विशाल शिंदे, निरंजन लोखंडे, कविता म्हस्के, बाजीराव गवळी यांचा सन्मान करण्यात आला.
सुरक्षाविषयक प्रबोधनात्मक कविसंमेलन झाले. कवयित्री शोभा जोशी यांनी ‘संघटन हीच महाशक्ती’ ही कविता सादर केली. प्रदीप गांधलीकर यांनी ‘राष्ट्राची निर्मिती तुझ्या हाती’..ही श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे यावर भाष्य करणारी कविता सादर केली. निशिकांत गुमास्ते यांनी ‘आयुष्यातील संभाव्य धोके थोडे तरी टाळू’.. या कवितेला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कैलास भैरट, फुलवती जगताप ,वर्षा बालगोपाल, सुरेश कंक, यांनी आपल्या सुरक्षाविषयक कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

बहारदार सूत्रसंचालन कवी तानाजी एकोंडे यांनी केले तर आभार चैताली भंगाळे यांनी मानले. सर्व उपस्थित कामगारांना याप्रसंगी सुरक्षितता शपथ देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *