पुणे, दि.१२ : देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं आज पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. रुबी रुग्णालयात काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते.
उद्योजक राहूल बजाज हे आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे मागील दोन महिन्यांपासून दाखल होते. वयोमान आणि त्याचवेळेस हृदयाचा आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजता त्यांच रुबी हॉल क्लिनिकमधे निधन झालं.
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते. औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना २००१ साली पदमभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राहुल बजाज यांचा विवाह १९६१ साली रुपा घोलप या महाराष्ट्रीय तरुणीसोबत झाला. या जोडप्यांना राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुलं आहेत.
गेली ५० वर्षे ते आकुर्डी येथील बजाज कारखाना परिसरातच वास्तव्याला होते. अत्यंत रोखठोक स्वभाव असलेल्या बजाज यांचा सर्व राजकिय नेत्यांशी सलोखा होता.