मुंबई :- गानसरस्वती, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज दुःखद निधन झाले. आपल्या स्वर्गीय सुरांनी अनेक गीतांना अजरामर करणाऱ्या लतादिदींचा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

संपूर्ण जगाला आपल्या सुरेल आवाजाने वेड लावणाऱ्या लता मंगेशकर या 93 वर्षांच्या होत्या. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजून अकरा मिनिटांनी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. मराठी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून नाव कमावलं. सर्व प्रकारची गाणी लतादीदी गायल्या आहेत.

28 सप्टेंबर 1929 रोजी तत्कालीन इंदोर संस्थानात जन्म झालेल्या लतादीदी मंगेशकरांच्या घरातलं थोरलं अपत्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं या आपल्या थोरल्या लेकीवर जीवापाड प्रेम. तिच्यातली गानप्रतिभाही त्यांनी खूप लहानपणीच हेरली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लतादीदी अगदी लहानपणापासून आपसूकच ऐकून ऐकून ताना घेत असत. त्यानंतर त्यांनी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं आणि लहानपणीच संगीत नाटकातून पं. दीनानाथ मंगेशकरांची ही लेक व्यासपीठावर वावरू लागली.दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हरपलं आणि अवघ्या 13 व्या वर्षी छोट्या लताची लतादीदी झाली.

आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाठच्या भावंडांची पाठराखण करत आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत गायनाचा व्यवसाय म्हणून विचार करू लागली. 1942 मध्ये मास्टर विनायक यांच्य नवयुग सिनेमासाठी त्यांचं गाणं सुरू झालं, ते अगदी नव्वदीपर्यंत अविरत सुरू होतं. 1945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढे खुलं झालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरशः हजारो गाणी त्यांनी गायली. हिंदी-मराठीच नव्हे तर 36 भारतीय भाषांतली गाणी लतादीदींनी गायली2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. त्यापूर्वी त्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या होत्या. याखेरीज फ्रेंच आणि ब्रिटीश सरकारचे सर्वोच्च नागरी सन्मानही लता मंगेशकर यांना मिळाले.

लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी देशभर पसरताच संपूर्ण देशभरात शोकाची लाट पसरली आहे. तसेच, लतादिदींच्या जाण्याने संगीतविश्व, कलाविश्व पोरके झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून आणि दिग्गजांकडून देण्यात येत आहे.

—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *