पुणे दि.१:- पिंपळे गुरव येथील जलतरण तलाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठी २ फेब्रुवारीपासून खुला करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक क्रीडा आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चालविण्यात येणारे सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होते. राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जलतरण तलाव सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेचा पिंपळे गुरव जलतरण तलाव फक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठी २ फेब्रुवारीपासून शनिवार ते गुरुवार सकाळी ६ ते १० व दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सुरू राहणार आहे. शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असणार आहे.
जलतरण तलावावर कोरोनाचे सर्व नियम पाळून तसेच खेळाडू व प्रशिक्षक यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत याची खात्री करूनच खेळाडू व प्रशिक्षक यांना प्रवेश देण्यात येईल. महानगरपालिकेचे इतर जलतरण तलाव गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याने स्थापत्य व विद्युत विषयक विषयक कामे करणे आवश्यक आहे. स्थापत्य व विद्युत विषयक विषयक कामे पूर्ण होताच इतर जलतरण तलावही राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठी सुरू करण्यात येतील, अशी माहितीही श्रीमती शिंदे यांनी दिली.