पिंपरी (दिनांक :३० जानेवारी २०२२):-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिलासा संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक ३० जानेवारी २०२२ रोजी पिंपळे-गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानासमोर ‘सत्यमेव जयते’ या भारताच्या ब्रीदवाक्याचा जागर करून महात्मा गांधी यांना आदरांजली समर्पित करण्यात आली. या अभियानात ज्येष्ठ साहित्यिक डॉ.पी.एस.आगरवाल, अक्षरभारती पुणे कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले, दिलासा संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश घोरपडे, नंदकुमार कांबळे, निशिकांत गुमास्ते, दिलीप ओव्हाळ, मुरलीधर दळवी, सुभाष शहा, विजया नागटिळक, मधुश्री ओव्हाळ, जयश्री गुमास्ते, संगीता सलवाजी, एकनाथ उगले, शिरीष पडवळ, सुंदर मिसळे, शोभा माने, अंजली दिवेकर, मालती पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कवी शरद शेजवळ यांनी महात्मा गांधी यांचे स्मरण म्हणून “वैष्णव जन तो तेणे कहिये” हे भजन सादर करून ‘सत्यमेव जयते’ या अभियानास सुरुवात केली. दिलासा संस्थेच्या वतीने साहित्यिक अनिल अवचट, समाजसेविका सिंधुताई सपकाळ, नाट्यअभिनेत्री कीर्ती शिलेदार, संगीत रंगभूमी गायक रामदास कामत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘सत्य अमर आहे!’ , ‘सत्य, अहिंसा अन् शांतिमंत्र जपू या!’ , ‘सत्याने चालावे, सत्याने वागावे!’ , ‘सत्य हे ईश्वरी देणं आहे!’ , ‘सत्य सूर्यप्रकाशासारखे असते!’ असा घोष यावेळी करण्यात आला. याप्रसंगी डॉ. पी. एस. आगरवाल म्हणाले, “महात्मा गांधी सत्याचे पुजारी, अहिंसेचे उपासक आणि शांतीचे भक्त होते. सत्य एखाद्या विशाल वृक्षासम असते त्या छायेत प्रत्येक माणसाने सत्यप्रिय व्हावे. स्वच्छता धर्म पाळणे हा त्यांचा गुण समाजाने कायम अंगीकारला पाहिजे!” साहित्यिक श्रीकांत चौगुले म्हणाले, “सत्य आणि अहिंसा ही चिरंतनमूल्ये असून ‘सत्यमेव जयते’ या विचाराला आपल्या राष्ट्रीय प्रतीकात अढळस्थान मिळाले आहे. ते आचरणात आणणे आणि त्याची जोपासना करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे!” शिवाजीराव शिर्के यांनी ‘बापूजींच्या स्वप्नातील भारत घडवू’ ही कविता सादर केली. प्रास्ताविक दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केले. सूत्रसंचालन कवी तानाजी एकोंडे यांनी केले; तर आभार शामराव सरकाळे यांनी मानले. ‘वंदे मातरम्’ म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.