भोसरीतील मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश…

पिंपरी (दि.22 डिसेंबर 2021):- गावखेडं ते आंतरराष्ट्रीय दर्जाची उद्योगनगरी हा नावलौकीक पिंपरी चिंचवड शहराला कॉंग्रेसमुळे मिळाला आहे. उद्योग नगरी, कामगार नगरी आता स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी या सर्व टप्प्यांवर कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी घेतलेले निर्णय आणि कॉंग्रेस पक्षाला येथील नागरीकांनी दिलेली साथ महत्वाची आहे. काँग्रेसने शहरवासियांना पहिल्यापासून विश्वास दिला त्यामुळेच शहराचा विकास झाला. ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिले महापौर आणि आमदार होण्याचा मान कॉंग्रेसने दिला. पण आज त्यांचे चिरंजीव भाजपाबरोबर जाऊन भ्रष्टाचारात सामिल झाले. त्यामुळे भोसरीकरांची मान खाली गेली अशा प्रवृत्तींना रोखण्याचे काम आणि कॉंग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार आता भोसरीकरांनी केला आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचा रविवारी (दि.19डिसेंबर) आदर्शनगर, भोसरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व उल्लेखनीय कार्य करणा-या नागरीकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यापुर्वी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यानंतर बुध्द विहारात अभिवादन करुन पीएमटी चौक ते सॅण्डविक कॅालनी ते आदर्शनगर पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या नंतर झालेल्या मेळाव्यात डॉ. कैलास कदम बोलत होते. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या रेखा ओव्हाळ, बहुजन समाज पक्षाचे पुणे जिल्हा सचिव हरिष डोळस तसेच मनोरमा रोकडे, कोमल पाईकराव, सीमा आगम, बहूजन समाज पक्षाच्या अनिता डोळस, सविता डोळस, भीमाई बचत गटाच्या शीतल साळवे, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई डोळस, संगीता जाधव, आशा जाधव व अनिता अडसुळे यांनी काँग्रेस पक्षात अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे व डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. त्यांचे काँग्रेसचे उपरणे देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.

या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या रघुनाथ डोळस, भीमराव गायकवाड, सुरेश डोळस, राघू कदम, डॉ. आलम, पुष्पेन्द्र नाईक, शंकर गंगावणे, मुनव्वर शहा रौफ शेख, मौलाना रहमत अली, मौलाना अब्दुल लतीफ, अरुण वाघमारे, जगन्नाथ जाधव, रफ्तार भाई शहा, अनिल जाधव, अनिल रोकडे, बालाजी पाईकराव, गौतम आगम, दिनेश पडघम, आरिफ खान, पेत्रस पारखे, प्रकाश पोपळे यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डॅा. वसीम इमानदार, ॲड के. एम. रॅाय, ओबीसी विभागाचे अध्यक्ष अल्ताफ शेख, महिला नेत्या नंदाताई तुळसे, छायावती देसले, शाम भोसले, अबुबक्र लांडगे, विश्वनाथ जगताप, हिराचंद जाधव, सौरभ शिंदे, आयोजक हरीश डोळस, मोहसिन शेख, गोरक्षनाथ वाघमारे, स्वप्निल बनसोडे आदी पदाधिकारी व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले की, भाजपच्या भ्रष्टाचारी राजवटीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचे काम आम्ही करत आहोत. भोसरीतील हा मेळावा परिवर्तनाची नांदी ठरणारा आहे. शहरात परिवर्तन होणार हे आता स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाकडे वाढणारा नागरिकांचा कल व विविध पक्ष संघटनांतून प्रवेश होणारे हे त्याचे प्रतिक आहे. पक्षात आलेल्या सर्वांचा योग्य मान सन्मान जपत त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा कर्तव्य बजावण्यात आम्ही कमी पडणार नाही असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले की, “आज देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाला काँग्रेस पक्षांच्या नेतृत्वाची नितांत गरज आहे अशी भावना जनमाणसात आहे. भाजपाने देश विकायला काढला आहे, काँग्रेस पक्षाने देशात जे जे उभारलं ते भाजपाने विकायला काढून देशापुढे अर्थिक संकट निर्माण केले आहे. भाजपाची भ्रष्टसत्ता भांडवलदारांना पूरक आहे. ही सत्ता उलथवून टाकून सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासणा-या कॉंग्रेसची सत्ता केंद्रात आली पाहिजे असा निर्धार देशभरातील जनता करीत आहे. हिच भोसरीसह पिंपरी चिंचवडकरांची प्राथमिकता आहे. शहरातील राजकीय परिस्थिती पाहता सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या निवडीनंतर अल्पावधीतच शहरात काँग्रेस पक्षाने अतिशय चांगले, प्रभावी व उत्तम काम सुरू केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उर्जा निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाने जनतेची लूट सुरू केली आहे व केंद्रातील भाजपा कडून देशातील विविध संस्था विक्रीस काढल्या जात आहेत. या दुहेरी संकटामुळे जनता आक्रोश करत आहे व या प्रसंगात काँग्रेस पक्ष जनतेबरोबर खंबीर पणे उभा आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व बंधू भगिनींचा योग्य मान सन्मान राखला जाईल असे पृथ्वीराज साठे म्हणाले.

स्वागत काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, सुत्रसंचालन युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आणि आभार डॉ. वसिम इनामदार यांनी मानले.
————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *