करसंकलन विभागातील दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले…

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज पुन्हा एकदा अँन्टी करप्शन ब्युरोची धाड पडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगांव कर संकलन विभागात आज सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) धाड टाकली. या धाडीमुळे सर्वांचे धाबे दणाणले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगांव करसंकलन कार्यालयातील दोन कर्मचा-यांना लाच घेताना रंगेहाथ पडकले आहे. ही कारवाई सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयातील लिपिकी प्रदीप शांताराम कोठावडे आणि मुख्य लिपिक हैयबती मोरे या दोन कर्मचा-यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि तीन हजार रुपये लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई थेरगाव करसंकलन कार्यालयाच्या दुस-या मजल्यावर झाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीपी विजयमाला पवार यांनी केली आहे.

दरम्यान, थेरगांव करसंकलन कार्यालयात दोन कर्मचा-यांना एसीबीने धाड टाकून पकडल्यानंतर तेथील प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप आणि सहायक मंडल अधिकारी सरगर हे देखील पहिल्या मजल्यावर उपस्थित होते. त्या दोन्ही वरिष्ठ अधिका-यांना चौकशी करण्यासाठी पुण्याच्या कार्यालयात घेवून गेले आहेत. मात्र, त्या कर्मचा-यांनी नेमकी लाच कोणत्या प्रकरणात घेतली हे अद्याप समजले नाही. या प्रकरणी दोन कर्मचा-यांवर अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *