– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी :- भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुला खालील सुशोभीकरणाची कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आहेत. तरीही सुशोभीकरणाची कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या चौकाला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. उड्डाणपुलाखाली सर्वत्र राडारोडा, कचरा यांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी भाजपा नगरसेवक सागर गवळी यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाने सुशोभीकरणाच्या कामासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर केला. चांदणी चौक ते अंकुशराव लांडगे नाट्यगृह परिसरापर्यंत सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. यामध्ये उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ व सेवा रस्ता विकसित करणे, नियोजित वाहनतळ, भाजी मंडई, आसनव्यवस्था फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था, वृक्षारोपण, भूमिगत जलवाहिन्या, सुरक्षित रस्ता इत्यादींचा समावेश आहे.
गेल्या दोन वर्षापासून सुशोभीकरणाची कामे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी आसनव्यवस्था व ब्लॉक बसविले आहेत. परंतु त्या बांधकामांची पडझड झाल्याचे दिसून येते. कामाच्या ठिकाणी दोन व चार चाकी वाहनांची पार्किंग झाली आहे तर काही ठिकाणी हातगाडे- धारक व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे सुशोभीकरणाच्या बांधकामास बाधा पोहोचत असल्याचे दिसते.

बांधकामाच्या ठिकाणच्या परिसरात अस्वच्छता आहे. काही ठिकाणी बांधकाम अर्धवट झाल्याचे दिसत आहे. ही कामेही संथगतीने सुरू असल्याने बांधकामाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृ हासमोरील परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच बांधकामावरती हातगाडे, टपरीधारक व किरकोळ व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असताना कारवाई मात्र होताना दिसत नाही. प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *