चिंचवड गाव:- ‘नेमिच येते जलपर्णी.. कुणाची करावी मनधरणी..’ असे म्हणत पिंपरी चिंचवड शहरातील साहित्य संवर्धन समितीने नव्याने फोफावत असलेल्या जलपर्णीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित केले. या लक्ष्यवेधी उपक्रमात राज अहेरराव, शोभाताई जोशी, श्रीकांत चौगुले, प्रा.तुकाराम पाटील, प्रदीप गांधलीकर, राजेंद्र घावटे, सुहास घुमरे, कैलास भैरट, सुभाष चव्हाण, सविता इंगळे, वर्षा बालगोपाल, नंदकुमार मुरडे, नितीन हिरवे, तानाजी एकोंडे, वसंत ठोंबरे,अशोक गोरे, राजू जाधव, सुप्रिया लिमये, निलेश शेंबेकर, बाळासाहेब सुबंध, जयश्री श्रीखंडे, मल्लिकार्जुन इंगळे, यशवंत देशपांडे, विनोद चटप यांनी नदीतील वाढणारी जलपर्णी हाती घेऊन सहभाग घेतला.
यावेळी साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले- “पिंपरी चिंचवड शहरातील सर्व साहित्यिक साहित्य संवर्धनाची बांधिलकी जपण्याबरोबर पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध आहेत. रावेतपासून ते सांगवी गावापर्यंत जलपर्णी नदीत दिसू लागली आहे. ही जलपर्णी नदीत फोफावण्यापूर्वी वेळीच काढली तर पुढील काळात जलपर्णीतून निर्माण होणारे डास अन नदीचा उग्र वास येणार नाही. मलेरिया, डेंग्यूसारखे आजार उदभवणार नाहीत यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका जलपर्णी काढण्यासाठी ज्या ठेकेदारांना टेंडर देते त्यांनी वेळीच जलपर्णी काढावी. आजार वाढल्यावर आटोक्यात येत नसतो. सुरवातीलाच औषध घेणे जसे हितकारक असते तसे वेळीच जागरूकता महापालिकेने घ्यावी.जलपर्णीमुळे होणारा त्रास तुम्हा आम्हा सर्वांना गेली अनेक वर्षे भोगावा लागत आहे. अशा भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.”