यशस्वी उद्योजक माजी सैनिकांना “उद्योग रत्न” पुरस्कार प्रदान…
पुणे (प्रतिनिधि) :- सन १९७१ साली झालेल्या युद्धाच्या विजयी दिनाचे औचित्य साधत म्हणजेच सुवर्ण विजयी महोत्सवा निमित्त ( विजयाला ५० वर्ष पूर्ण ) सैनिक फेडरेशनच्या वतीने दि. ३० ऑक्टोबर रोजी सैनिक लॉन्स घोरपडी, पुणे येथे सैनिक फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय थलसेनेचे जनरल इंद्रजीत सिंग, एरिया कमांडर सदन कमांड व १९७१ च्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले वीर सैनिक योद्ध्यांसह विविध सैनिक संघटनेतील असंख्य सैनिक उपस्थित होते. याप्रसंगी आजी माजी सैनिकांच्या हितासह सामाजिक हिताचे अनेक ठराव एकमताने संमत करत मंजूर करण्यात आले.
आधिवेशन सोहळ्यामध्ये १९७१ च्या युद्धातील सहभागी वीर सैनिकांचा व शहीद परीवारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याच बरोबर सैनिक फेडरेशनच्या उद्योग विंग विभागाच्या वतीने विविध उद्योग, व्यावसाय माजी सैनिकांनी कोणते व कशाप्रकारे चालू करावे याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री. नारायण अंकुशे, शंभुसेना प्रमुख व सैनिक फेडरेशन उपाध्यक्ष श्री. दिपक राजे शिर्के, सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री. अनिल सातव व शंभुसेना प्रदेश सरचिटणीस सैनिक फेडरेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री. बाबासाहेब जाधव आदी यशस्वी माजी सैनिक उद्योजकांना “उद्योग रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सैनिक फेडरेशन पुणे विभाग व उद्योग विभागाच्या टीमचे भरभरून कौतुक केले. सैनिक संमेलनासह उद्योजकता विकास शिबिर हे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, उपाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपक राजे शिर्के, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, अनिल सातव, पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, पुणे जिल्हा संघटक तुकाराम डफळ, जिल्हा संघटक संपत दिघे आदी माजी सैनिकांनी परिश्रम घेऊन यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल महाराष्ट्रातील सर्व सैनिक संघटनांचे व सर्व आजी- माजी सैनिकांचे सैनिक फेडरेशनच्या वतीने फेडरेशन उपाध्यक्ष व शंभुसेना प्रमुख दिपक राजे शिर्के यांनी आभार मानले. साई करिअर अकॅडमी, लोहगांव पुणे च्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी (भावी सैनिकांनी ) उत्स्फुर्त सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.. जय जवान..जय किसान..जय शंभुराजे..या जय घोषांनी परिसर दुमदुमुन गेला होता…