पिंपरी (दिनांक : १४ ऑक्टोबर २०२१) :- दुर्गाष्टमीचे औचित्य साधून सुभाष चव्हाण लिखित आणि संवेदना प्रकाशननिर्मित ‘जागर आदिशक्तीचा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते बुधवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झाला. पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, कवयित्री शोभा जोशी, वर्षा बालगोपाल, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती; तसेच पिंपरी-चिंचवडमधील बहुसंख्य मान्यवर साहित्यिकांची कार्यक्रमात उपस्थिती होती.
या प्रसंगी स्नेहल चव्हाण यांनी ‘जागर आदिशक्तीचा’ या पुस्तकाच्या निर्मितीमागची प्रक्रिया हृद्य शब्दांत कथन केली; तर लेखक सुभाष चव्हाण यांनी, “आईवडिलांचे आशीर्वाद, कुटुंबीयांचे पाठबळ आणि मित्रपरिवाराचे सहकार्य यामुळे पुस्तकलेखनाचे स्वप्न साकार झाले!” अशी कृतज्ञतेची भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली. प्रकाशक नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक केले. स्वप्निल चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले; तर भाऊसाहेब गायकवाड यांनी आभार मानले.