पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संत बहिणाबाई प्राणी संग्रहालय शहरातील नागरीकांच्या सोईसाठी २० वर्षापासून कार्यरत आहे. शहरात जखमी अवस्थेत सापडणारे पक्षी, प्राणी उपचारासाठी या संग्रहायात नागरीक व पशू व पक्षांसाठी काम करणा-या विविध संस्था दाखल करतात. या प्राणी संग्रहालयातील पशू वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करुन ते परत निसर्गांत सोडतात. सदर प्राणी संग्रहालयाचे नुतनीकरणाचे काम सन २०१६ पासून सुरु आहे, दिनांक २०/०५२०१६ रोजी पहिली निविदा र.रु. १४ कोटी ची काढण्यात येऊन कामाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर दुसरी निविदा सन २०१९ रोजी र.रु. ५ कोटी ८२ लाखा ३२ हजार ची काढण्यात आली होती व कामाचे आदेश दिनांक ०५/०९/२०१९ देण्यात आले होते. मागील सहा वर्षापासून नुतनीकरणाचे काम सुरुच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांसाठी संत बहिणाबाई प्राणी संग्रहालय अजून बंदच आहे. त्यामुळे शहरातील निसर्गप्रेमी व प्राणीप्रेमीमध्ये नाराजीचा सुर आहे सदरचे नुतनीकरणाचे काम भाजपच्या सत्ताकाळातच रखडले आहे. असे माजी महापौर मंगलाताई कदम यांनी सांगितले.
मागील पाच वर्षापासून या प्राणी संग्रहालयाच्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या वेळोवेळी तक्रारी येत आहेत. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या होणा-या निष्काळजीपणाबाबत वेळोवेळी मी स्वत: मा. आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मग त्या दि. २०/०८/२०१७ रोजी अजगर चोरी प्रकरण असो वा दि.२०/०७/२०२० रोजी वर्ल्ड फॉर नेचरच्या वन्यजीव संरक्षकाने बोनेलीचा गरुड जखमी अवस्थेत संत बहिणाबाई प्राणी संग्रहालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केला होता. त्याच्यावर योग्य वैद्यकीय उपचार होऊन तो परत निसर्गांत सोडून देणे अपेक्षित होते. परंतु त्याच्यांवर जुजबी उपचार करण्यात येऊन १० ते १५ दिवसांनी त्याला जखमी अवस्थेमध्येच दुर्गा देवी टेकडीच्या उद्यानात सोडून देण्यात आले. सदर संस्थेत याची माहिती मिळाल्यानंतर या संस्थेच्या वन्यजीव संरक्षकांनी त्या अशक्त व उडता न येणा-या गुरुडाला ताब्यात घेऊन पुणे येथील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्या पंखाला फ्रँक्चर असून त्याच्या उपचारासाठी २० ते २५ दिवस लागतील असे तेथील पशुवैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. वन्यजीव अधिनियम १९७२, शेड्युल २ च्या या प्राण्यांबाबत मनपाच्या संत बहिणाबाई प्राणी संग्रहालयातील पशूवैद्यकीय अधिका-यांनी केलेला निष्काळजीपणामुळे दुर्मिळ पक्षाच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. व याबाबत वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेने लेखी तक्रार दिलेली आहे. त्याच प्रमाणे प्राण्यांच्या आहारात देखील कुचराई केली जात असल्याबाबत मंगलाताई कदम यांनी मा. आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते.
संत बहिणाबाई प्राणी संग्रहालय हे माझ्या प्रभागात असल्यामुळे जेव्हापासून हे सर्पोद्यान होते तेव्हापासूनच या संग्रहालयाकडे बारकाईने लक्ष देत आले आहे. वेळोवेळी भेट देऊन तेथील अधिकारी / कर्मचा-यांशी चर्चा करुन प्राणी संग्रहालयाशी संबधित अडचणी नेहमी सोडवित आलेले आहे. त्याच प्रमाणे नुतनीकरणाच्या कामाचा आढावा सुध्दा वेळोवेळी घेत आहे.
आता मनपाच्या सार्वत्रिक निवडणूका आल्यात त्यामुळे शहरातील नागरीकांना, प्राणी प्रेमींना या संग्रहालयाबाबत आपण किती जागरुक आहोत हे दाशविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. शहरातील नागरीकांना चांगले माहिती आहे की, या प्राणी संग्रहालयासाठी कोण काम करीत आहे. सदरचे नुतनीकरणाचे काम भाजपच्या काळातच रखडले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या नाकर्त्या कारभाराची एकप्रकारे कबुलीच दिली आहे. भाजपच्या काळात या संग्रहालयाच्या नुतनीकरणाच्या कामाची वाट लावून २० कोटी रुपयांचे मनपाचे नुकसान केले आहे असे मंगलाताई कदम यांनी सांगितले.