नगरसेवक विकास डोळस यांचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांना निवेदन…
पिंंपरीी :- दिघी-वाढत्या शहरीकरणासोबतच उद्योगनगरीत पर्यावरणाची समस्या गंभीर होत चालली आहे. इलेक्ट्रॅनिक कंपन्या व त्यासंबधी व्यवसायाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच विविध आजारांमुळे मेडिकल क्षेत्राचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जैविक व ई –कचऱ्याची प्रचंड प्रमाणात निर्मीती होत आहे. परंतु, त्यांच्या विल्हेवाट लावण्याची योग्य पध्दत महापालिका प्रशासनाकडून केली जात नाही. या समस्यांकडे गांभीर्यांने पाहिले जात नाही. त्यामुळे शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने लवकरात-लवकर ई-कचऱ्याबाबत योग्य पावले उचलावीत, यासाठी नगरसेवक विकास डोळस यांनी महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांना निवेदन दिले आहे.
नगरसेवक विकास डोळस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, ई-कचऱ्याबाबत महापालिकेने २०१४ मध्ये मोबाईल व्हॅन सुरु करण्याचा प्रयोग केला होता. एका महिन्यातच हा प्रयोग अयशस्वी झाला. त्यानंतर मात्र ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. शहरात अनेकजण उच्चशिक्षित आहेत,माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेकजण कामाला आहेत. अनेकांकडे मोबाईल, संगणक अशा वस्तू आहेत. या वस्तू नादुरूस्त होतात, अशा वेळी हा ई-कचरा कुठे जमा करायचा हा प्रश्न अनेक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन उदासिन असल्याचे चित्र पहायला मिळते आहे.
ई-कचरा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी देखील घातक आहे. त्यांच्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. ई-कचऱ्यामुळे कचरा डेपोमध्ये आगी लागण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. काही सामाजिक संस्था ई-कचरा गोळा करण्याचे छोटे मोठे उपक्रम घेत असतात पण ते ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन ई-कचरा कुठे जमा करायचा, त्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत जनजागृती करून, योग्य पाऊले उचलावीत. याबाबतच्या उपाययोजनांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करावा अशी मागणी नगरसेवक डोळस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.