पिंपरी, पुणे (दि. 15 सप्टेंबर 2021):- पुणे मनपाची परिवहन संस्था (पीएमटी) आणि पिंपरी चिंचवड मनपाची परिवहन संस्था (पीसीएमटी) यांचे एकत्रीकरण करुन 19 ऑक्टोबर 2007 रोजी ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ची (पीएमपीएमएल) स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या विलीनीकरणाच्या वेळी पीएमटी आणि पीसीएमटीच्या सर्व बसेस, मालमत्ता आणि कर्मचा-यांचे एकत्रीकरण करुन साठ टक्के हिस्सा पुणे मनपाचा आणि चाळीस टक्के हिस्सा पिंपरी चिंचवड मनपाचा असे 60:40 चे सुत्र ठरवण्यात आले.

त्याप्रमाणे ‘पीएमपीएमएल’ ला येणा-या संचलन तुटीपैकी दरमहा चाळीस टक्के रक्कम पिंपरी चिंचवड मनपा देते. यावर्षी दरमहा सुमारे बारा कोटी रुपये पीएमपीला पिंपरी चिंचवड मनपा देत आहे. आज बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) झालेल्या पिंपरी चिंचवड मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीतही सप्टेंबर 2021 च्या संचलन तुटीकरीता बारा कोटी रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतू पीएमपीएमएल व्यवस्थापन दरवेळी पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील नागरीकांवर आणि पुर्व पीसीएमटीतील कर्मचा-यांवर अन्याय करते. पिंपरी चिंचवडच्या करदात्या नागरीकांना समाधानकारक सेवा द्या. अन्यथा पीएमपीएमएल बरखास्त करा अशी मागणी पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे सदस्य प्रविण भालेकर यांनी बुधवारी केली.

मनपा भवनात विरोधी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना भालेकर बोलत होते. यावेळी स्थायी समिती सदस्य राजू बनसोडे, सुलक्षणा धर उपस्थित होत्या.

यावेळी प्रविण भालेकर यांनी सांगितले की, पीएमपीएमएलच्या एकूण बसेस पैकी 600 बसेस म्हणजे चाळीस टक्के बसेस नादुरस्त आहेत. पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक पिंपरी चिंचवड मनपा भवनमध्ये आयोजित केलेल्या बैठकांना उपस्थित न राहता इतर अधिका-यांना पाठवून वेळ मारुन नेतात. तसेच पुर्व पीसीएमटीतील कर्मचा-यांच्या बदल्या, पदोन्नती बाबत, पिंपरी चिंचवड हद्दीत नविन बसमार्ग करणे, अंतर्गत गावांमध्ये बसमार्ग करणे याबाबत नेहमीच दुजाभाव करतात. पिंपरी चिंचवड शहरातील मार्गावर जून्या आणि नादुरुस्त बस पाठवतात. हा पिंपरी चिंचवडच्या सर्व नगरसेवकांचा तसेच करदात्या नागरीकांचा अपमानच आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड मनपा संचलन तुट, विविध प्रकारचे सवलतींचे पासेस यासाठी आणि नविन बस खरेदिसाठी 504 कोटी रुपये मार्च 2022 पर्यंत देणार आहे. एवढे पैसे देऊनही त्याप्रमाणात पिंपरी चिंचवडच्या नागरीकांना सेवा मिळत नसेल तर पीएमपीएमएल बरखास्तच केली पाहिजे. या मागणीसाठी स्थायी समितीतील राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी आजच्या बैठकीत आग्रह धरला. शहरवासीयांना उत्तम सेवा मिळून देण्यासाठी आणि पीएमपीएमएलच्या बरखास्तीच्या मागणीसाठी आम्ही लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटणार असल्याचेही प्रविण भालेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *