इतरांना राजीनामे मागणा-या भाजप नेत्यांना नैतिकतेचा विसर पडला
पिंपरी : गल्ली ते दिल्ली सर्वच ठिकाणी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्या राजकीय पोळ्या भाजणारा पक्ष, अशी ओळख भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. खोटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे काम पाच वर्षांपूर्वी भाजपच्या नेते मंडळींनी केले होते. परंतु भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर भाजपला आपली नैतिकता आठवली नाही. पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी भाजपच्या या भ्रष्टाचारावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील गप्प का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला. बेस्ट सिटीचा बहुमान या शहराला मिळवून दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पंधरा वर्षाच्या कारकीर्दीत केलेल्या विकासकामांना तोड नव्हती. त्यावेळी विकासकामांवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढणे अशक्य होते. त्यामुळे भाजपने 2017 च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील कारभारावर बेछूट आरोप केले. त्यांच्या खोट्या आरोपांना भाजपच्या राज्यातील नेत्यांनी बळ दिले. चौकशा करण्याच्या वल्गना केल्या. प्रत्यक्षात त्यावेळी भाजपने आरोप केलेल्या आणि त्यांच्याच सत्ताकाळात चौकशी झालेल्या विठ्ठलमूर्ती, शवदाहिनीसारख्या एकाही प्रकल्पात काहीही समोर आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस विकासाचा अजेंडा राबवत असताना जनतेच्या तिजोरीवर कोणी डल्ला मारणार नाही, याची खबरदारी घेत होते.
या उलट मागील साडेचार वर्षात भाजपने पिपंरी चिंचवड महापालिकेत कारभार चालवलेला आहे. शहराची भाजपने दुर्दशा करून ठेवली आहे. महापालिकेच्या अनेक कामात रिंग, भ्रष्टाचार चाललेला आहे. शहराच्या नागरिकांचा हिताचा विचार कुठेही दिसत नाही. तर भाजपच्या पारदर्शक कारभाराचा खरा बुरखा स्थायी समितीवर झालेल्या कारवाईनंतर फाटला. स्थायी समितीच्या अध्यक्षांना अटक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. परंतु नैतिकतेचा विसर पडलेल्या सत्ताधारी भाजपने त्यांचा राजीनामा घेतला नाही. लाखो रुपया घेतानाच्या लाच प्रकरणात अटक 0होऊ जामिनावर सुटलेल्या स्थायी समिती अध्यक्षांकडून कारभार सुरू ठेवला आहे.
यावरून भाजपचे भ्रष्टाचारी कारभाराला असलेले समर्थन उघडपणे स्पष्ट होते. परंतु पिंपरी-चिंचवडच्या या भ्रष्टाचारावर भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील गप्प का आहेत ? त्यांनी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना या लाच प्रकरणावरून उत्तर देणे गरजेचे आहे. लाच प्रकरणातील स्थायी समिती अध्यक्षांचा राजीनामा कधी घेणार, हे स्पष्ट केले पाहिजे. अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांच्या राजवटीत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभार बघता भाजपच्या नेत्यांना पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही, असे समजावे लागेल, अशी खरमरीत टीका संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.