– खासगी कंपनीच्या ‘सीएसआर’ फंडातून २० खाटांचे हॉस्पिटल लोकार्पण….
– आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून प्रत्येक समाविष्ट गावामध्ये हॉस्पिटलची संकल्पना दृष्टीक्षेपात….
पिंपरी :- पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्रभाग ३ मधील चऱ्होली गावठाणसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढाकार घेतला आहे. समाविष्ट प्रत्येक गावात एक सुसज्ज् हॉस्पिटल उभारण्याची संकल्पना यानिमित्ताने दृष्टीक्षेपात येत आहे, असे मत माजी महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते चऱ्होली गावठाण येथील बहुउद्देशीय रुग्णालय आणि विरंगुळा केंद्राचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. यावेळी श्री. काळजे बोलत होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, न्यूआन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकारी सौ. तनुका बैरागी, श्री. नवीन नायडू, नगरसेविका विनया तापकीर, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, नगरसेविका साधना तापकीर, शैलताई मोळक, स्विकृत नगरसेवक अजित बुर्डे, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे डॉ. विनायक पाटील, डॉ. म्हस्के आदी उपस्थित होते.
न्यूआन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खासगी आयटी कंपनीच्या ‘सीएसआर’ फंडातून २० खाटांचे स्थलांतरीत करण्यायोग्य रुग्णालय चऱ्होलीत उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. महापालिका प्रशासन आणि खासगी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत पाठपुरावा करण्यात आला. सध्यस्थितीला कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. कंपनी व्यवस्थापनाने याबाबत सुमारे ३ कोटी रुपयांची निधी खर्च केला आहे.
प्रभाग क्रमांक ३ मधील चऱ्होली गाव हे महापालिकेच्या हद्दीतील टोकाला आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासकामे करण्यात आली. मात्र, हॉस्पिटल नसल्याने त्याची उणीव येथील नागरिकांना जाणवत होती. आता ती उणीव देखील भरून निघाली आहे. महापालिकेच्या जागेवर निओन्स या आयटी कंपनीकडून रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचा फायदा निश्चितपणाने परिसरातील नागरिकांना होणार आहे. कोविड काळानंतर संबंधित रुग्णालय बहुद्देशीय पद्धतीने चालवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली.
रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा मिळेल : आमदार लांडगे
आमदार महेश लांडगे म्हणाले की, आयटी क्षेत्रातील खासगी कंपन्यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून मराठी माध्यमांच्या दुर्गम भागातील शाळांना मदत केली आहे. कंपन्यांना समाजाप्रती असलेली संवेदनशीलता यामधून दिसते. ज्या ठिकाणी शिक्षणासाठी मुलांना १० ते १५ किलोमिटर पायपीट करावी लागते. त्या शाळांना सीएसआरमधून मदत होत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीकडून सीएसआर देण्याचा विचार झाला. त्यावेळी आम्ही वायसीएम रुग्णालयाला महिंद्रा कंपनीने सीएसआर फंड द्यावा, असा आग्रह धरला. त्यामुळे ६५ लाख रुपयांचा खर्च करुन ब्लड बँक वायसीएममध्ये उभारण्यात आली. त्यानंतर लहान मुलांसाठी एलआयसीयू ३५ लाख रुपयांचे युनिट उभारण्यात आले. त्यामुळे कंपन्यांच्या मदतीने सर्वसामान्यांसाठी सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्तीत-जास्त लसीकरण करावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले. या रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
.. असे आहे रुग्णालय
स्थालांतरित करण्यायोग्य असलेले हॉस्पिटलमध्ये २० खाटांची सुविधा आहे. त्या मध्ये ८ आयसीयू बेड आणि १२ बेडचा आयसोलेशन वार्डचा समावेश आहे. सध्या हे कोविडसाठी हॉस्पिटल आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यास त्याचा इतर रुग्णांसाठी नियमित वापर करता येईल. नवीन हॉस्पिटल झाल्याने नागरिकांच्या आरोग्य समस्या मार्गी लागणार आहेत, असेही माजी महापौर नितीन काळजे यांनी म्हटले आहे.
जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र सुरू…
चऱ्होली गावात जेष्ठ नागरिक संघ सुरू व्हावे, अशी बऱ्याच दिवसांपासून जेष्ठांची मागणी होती. त्यांच्या मागणीची दखल घेत जेष्ठ नागरिकांना बागेश्वर महाराज जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरू केले. ८ महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्याचे देखील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून चऱ्होली येथे आणखी एक चांगला प्रकल्प सुरू झाला आहे, याचे समाधान वाटते, असे मत नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनी व्यक्त केले.