पिंपरी (दि.०९ सप्टेंबर २०२१) :- भाजपमधून आऊटगोईंग, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग अशी राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी आज गुरुवारी (दि.९) रोजी समर्थकांसह मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.
संतोष बारणे हे माजी विरोधी पक्ष नेते असले तरी, त्यांच्या पत्नी माया बारणे या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका आहेत, त्यामुळे बारणे यांच्या प्रवेशाला महत्व आले आहे.
गत पालिका निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आऊटगोईंग झाले होते. त्यामुळे महापालिकेत सत्तांतर होऊन २०१७ मध्ये भाजप प्रथमच पालिकेत सत्तेत आला होता. आता २०२२ च्या आगामी पालिका निवडणूकीला २०१७ च्या उलट होण्याचे संकेत आतापासूनच सुरू झालेल्या जोरदार राजकीय हालचालीतून मिळाले आहेत. भाजपमध्ये गेलेल्यापैकी अनेक नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी आणखी नऊ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावाही राष्ट्रवादीने केला आहे. पक्षांतराच्या तयारीत असलेले बहुतांश नगरसेवक हे भाजपचे कारभारी आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. हे दोघेही आमदार राष्ट्रवादीतूनच भाजपात गेलेले आहेत.