पिंपरी चिंचवड, दि. ३ सप्टेंबर – उद्योग विभागाने महाराष्ट्र राज्यातील स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. शासनाने महाराष्ट्रातील स्टार्टअपला पाठींबा देण्यासाठी “कॉर्नेल महा ६० ऍक्सेलेटर” या मोहिमेअंतर्गत “युएस” मधील कॉर्नेल विद्यापीठाशी भागीदारी केली असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील उद्योग विभागाने पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विकास (उद्योग) आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.
स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या इक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने पाच जिल्हयांचा सहभाग असलेल्या पुणे विभागात प्रथमच पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर येथे आज दि. ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन पुरस्कृत “कॉर्नेल महा ६० ऍक्सेलेटर” हा उपक्रम पार पडला. यावेळी नवउद्योजकांना मार्गदर्शन करताना डॉ. हर्षदीप कांबळे बोलत होते. यावेळी, व्यासपीठावर उद्योग सहसंचालक सुरेश लोंढे, युएस येथील कार्नेल युनिर्व्हसिटीचे प्रतिनिधी जॉन किलेलील, पीसीएमसीचे मुख्य माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख तथा स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, पुणे विभागाचे उद्योग संचालक सदाशिव सुरवसे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, राज्यातील नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात उद्योजक वाढीसाठी इक्युबेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उपेक्षित उद्योजकांना कार्यात्मक व्यवसाय कौशल्यांचे प्रशिक्षण देवून त्यांना उद्योगवाढीसंदर्भात मार्गदर्शन आणि एंजेल इन्व्हेस्टर्ससह नेटवर्कसाठी व्यासपीठ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, उद्योग तज्ञांकडून मार्गदर्शन देवून त्यांना सशक्त करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने या उपक्रमाला पूर्णपणे प्रायोजित केले आहे. कॉर्नेल महा ६० हा अर्धवेळ, ३० वर्षाचा कार्यक्रम असून यामध्ये १० ऑनलाईन आणि १२ कोचींग सत्रांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सुक्ष्म-लघु उद्योजकांसाठी सन २००६ साली ऑटो क्लस्टरची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत ३ ते ४ हजार सुक्ष्म व लघु उद्योजकांनी याचा लाभ घेतला. इक्युबेशन सेंटरसाठी महापालिकेने ५ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या या सेंटरच्या माध्यमातून देखील उद्योजकांना चांगल्या सुविधा देण्याचे काम सूरू आहे. पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने स्टार्टअप बॅच सूरू असून विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते. दरम्यान, नवउद्योजकांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात आपल्या प्रश्नांचे निराकरण केले.