पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्राथमिक विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची रायगड याठिकाणी बदली झाली आहे. याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी काढला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये 25 मे 2018 रोजी शिंदे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर काही दिवस रजेवर असल्याने त्यांनी कार्यालयीन कामकाज केले नाही. 2 जून 2018 पासून त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून कामास सुरूवात केली. सुरूवातीला त्यांनी महापालिकेच्या शाळा सुधारणा तसेच पटसंख्या वाढीवर लक्ष केंद्रीत केले. तसेच विविध उपक्रम राबवत शाळांचा दर्जा सुधारविण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यानच्या काळामध्ये शहरातील राजकीय व्यक्तींकडून त्यांच्यावर अनेक आरोप झाले. तसेच त्यांच्या बदलीचीही अनेकदा मागणी करण्यात आली होती. महापालिकेत तीन वर्ष तीन महिने त्यांनी प्रशासन अधिकारी म्हणून काम बघितले. आता त्यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून रायगड याठिकाणी बदली झाली आहे. त्यांना महापालिका प्रशासनाकडून अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नाही.