पिंपरी चिंचवड :- दि. २१ ऑगस्ट । पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नासंदर्भात आज आमदार अण्णा बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. भेटीदरम्यान शहरातील विविध प्रश्नांवर सर्वांगीण चर्चा झाली असल्याचे आमदार बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले.
चर्चेदरम्यान बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न व पिंपरी रेल्वे स्टेशन लगत असलेल्या डेरी फार्मची जागा रेल्वे प्रशासनाला देऊन त्या ठिकाणी सुसज्ज असे जंक्शन करण्यात यावे अशी मागणी केली असून लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीएमई) बोपखेल गावात जाणारा रस्ता लष्कराने बंद केल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बोपखेलवासियांसाठी खडकीला जोडणारा पूल बांधण्याचे ५० कोटी रुपये खर्चाचे काम कोर्टाच्या आदेशाने निविदा काढून महानगरपालिकेने हाती घेतलेले असून सुमारे ३० ते ४० टक्के काम पूर्ण झाले आहे केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे काम सध्या बंद आहे. लष्कर हद्दीतील काम working Permission नसल्याने बंद ठेवण्यात आलेले असून संरक्षण विभागाकडून मिळावी यासाठी मनपा अधिकारी संरक्षण विभागाशी संपर्कात असून साहेबांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. या बरोबरच कासारवाडी आणि पिंपरी रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या डेअरी फार्म येथील जागेवर रेल्वे जंक्शन करावे जेणे करून शहरात रोजगाराचे नवे धोरण तयार होऊ शकेल व रेल्वे जंक्शन होण्याने शहरात परराज्यात जाणाऱ्या तसेच मुंबई पुणे दरम्यान डेली प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होऊ शकते. डेरी फार्म सध्या वापरात नसून जागा पडून आहे ही जागा रेल्वे विभागाला द्यावी व त्या ठिकाणी रेल्वे जंक्शन करण्यात यावे परिणामी शहराचा नावलौकिक वाढून प्रवाशांची मोठी सोय होईल. सध्या सर्व प्रवाश्यांना पिंपरी चिंचवड येथून पुणे स्टेशन येथे जाऊन आपली रेल्वे पकडावी लागते अथवा येत असल्यास पुणे येथे उतरून पुनः शहरांकडे उलटा प्रवास करावा लागतो आणि प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जातो. याच बरोबर अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराची टांगती तलवार, भाजपने चालवलेला सावळा कारभार, नागरिकांच्या पैशांची लूट आदी मुद्देही आजी माजी आमदारांनी पवार यांच्यासमोर मांडले. त्यावर मी स्वतः शहरासाठी वेळ देईन असे आश्वासन साहेबांनी दिल्याचे आमदार बनसोडे व लांडे यांनी सांगितले.