– कर संकलन विभागाच्या ‘स्टंटबाज’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा…
– नगरसेवक विकास डोळस आणि शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी…
पिंपरी :- महापालिका कर संकलन विभागाच्या अधिकारी स्मीता झगडे यांनी टाटा मोटर्स कंपनीवर कारवाई केली. त्याची प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी करीत ‘स्टंटबाजी’ केली. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली आहे. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकारी झगडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.
टाटा मोटर्स कंपनीने वाढीव बांधकामाची नोंद केली नाही म्हणून मिळकतकर वसुलीसाठी नोटीस दिल्याच्या प्रकऱणात महापालिकेतील सत्ताधारी भाजपा नगरसेवक आक्रमक झाले आहेत. गुरूवारी ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. भाजपा नगरसेवक आणि नगरसेविका निषेधाचे फलक हातात घेवून सभेत सहभागी झाले. मिळकतकर विभाग प्रमुख स्मिता झगडे यांनी केवळ प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
शहराच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या टाटा कंपनीची नाहक बदनामी केल्या प्रकऱणात श्रीमती झगडे यांच्यावर कारवाई म्हणून त्यांना पुन्हा शासकीय सेवेत मागणी नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने सर्वसाधारण सभेनंतर महापालिका आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून केली.
काय म्हणाले नगरसेवक विकास डोळस…
महापालिकेच्या ऑनलाईन तहकूब सर्वसाधारण सभेतील सर्व विषयांवर निर्णय झाल्यानंतर विकास डोळस यांनी हा विषय छेडला. ते म्हणाले, टाटा मोटर्स कंपनीकडून सामान्य माणसाप्रमाणेच कर वसूल करा पण या कंपनीचे शहराच्या जडणघडणीत किती मोठे योगदान आहे याचा जरा विचार करा. आज शहरातील ७००० लघुउद्योग टाटा माटर्स कंपनीवर अवलंबून आहेत, हे लक्षात ठेवा. देशावर कुठलेही संकट आले तर सर्वप्रथम टाटा ग्रुप धावून जातो आणि मदत करतो. अशा कंपनीला मिळकत कर वसुलिसाठी नोटीस दिल्याने नाहक बदनामी झाली. नोटीस देणाऱ्या मिळकतकर विभाग प्रमुखांवर कारवाई करा, अशी मागणी डोळस यांनी केली.
ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांचाही संताप…
दरम्यान, विकास डोळस बोलत असताना महापौर माई ढोरे यांनी त्यांना मधेच थांबवल्याने जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे या खूप संतापल्या. ऑनलाईन सभेत १२ विषय अवघ्या १२ मिनीटांत मंजूर करता आणि या महत्वाच्या विषयावर नगरसेवक बोलत असतील तर त्यांना थांबवले जाते, हे बरोबर नाही असे सावळे यांनी यावेळी महापौर माई ढोरे यांना सुनावले. टाटा मोटर्स कंपनी बद्दल सावळे म्हणल्या, या विषयाचे थोडे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. नगरसेवक बोलत असतील तर त्यांना बोलू दिले पाहिजे. आज टाटा कंपनीची नाहक बदनामी झाल्याने उद्या ही कंपनीच बाहेर गेली, तर ७००० लघुउद्योग बंद पडतील. त्यातून भाजपाची नाहक बदनामी होईल. अशा विषयावर चर्चा झाली पाहिजे, असे मत सावळे यांनी मांडत टाटा कंपनीचे समर्थन केले.